श्री गजानन माहात्म्य (संक्षिप्त)

२१ अध्यायी पोथी

अध्याय १ ला

॥श्री गणेशाय नमः ॥ जय जयाजी गणनायका । लंबोदरा विनायका । वास तव त्रिलोका । गौरीसूता नमितो तुज ॥१॥ वाग्देवी देवी शारदे । कृपा प्रसाद लाभू दे । मतिमंदा बुद्धी दे । वरद दायिनी हो मज ॥२॥ तैसे नमन देवांगणा । कुलदेवते संतजना । स्थिर करी मन्मना । गजानन महात्म्य लिहावया ॥३॥ गजानन विजय ग्रंथ थोर । भक्तजना आवडे फार । पारायणे करिती नारीनर । समाधान चित्ता होतसे ॥४॥ परी प्रपंचाचा भार । साहूनी करिती व्यवहार । कुणी होती लाचार । सेवा न घडे हातुनी ॥५॥ हूर हूर वाटे मनी । रत व्हावे पारायणी । रमावे वाटे चिंतनी । नत मस्तक चरणी व्हावया ॥६॥ तयासाठी गजानना । वाटे दिधली प्रेरणा दुर्वांकुराची रचना । हाते करवूनी घेसी तू ॥७॥ स्तोत्र रुपी नमस्कार । पठण मात्रे चिंता दूर । अनुभविती जन साचार । प्रचिती ज्यांना येतसे ॥८॥ त्यांचीच आज्ञा म्हणून । चरित्र त्यांचे लहान । लिहावयासी कारण । निमित्त मात्र मी असे ॥९॥ मूळपोथी ओव्या फार । पारायणा लागे उशिर । तयास्तव हे सार । थोडक्यात रचियले ॥१०॥ उपासना ही त्यासाठी । नामस्मरणे देव पाठी । भक्ता तारी तो संकष्टी । पाप ताप भय हारक ॥११॥ असा योगी गजानन । शेगांवा करण्या पावन । माध्यान्ही बघती जन । अकस्मात पातला ॥१२॥ माघ वद्य सप्तमीसी । आला ज्ञानरवि उदयासी । सुखदायी सर्वांसी । भाविकांसी तारावया ॥१३॥ तिथे येई अग्रवाल । नाम त्याचे बंकटलाल । रत्न त्यासी वाटे अमोल । गवसले हे भाग्य त्याचे ॥१४॥ देविदास नामे सज्जन । होता तिथे एक जाण । कांही कारणे अन्नदान । घडले होते त्या गृही ॥१५॥ उच्छिष्ट पात्रे बाहेर । टाकिली गृहा समोर । तिथे हा योगीवर । गजानन पातला ॥१६॥ नसे कांही तयापाशी । पाहता वेडा भासे जनासी । भोपळा एक पाण्यासी । वृत्ती सदा शांत ती ॥१७॥ पात्रावरचे अन्न कण । खाई एक एक वेचून । भोपळ्यात नसे जीवन । तरी न खंत मनी असे ॥१८॥ अन्न परब्रह्म जाणावया । केली असे त्यांनी लीलया । जना लागी पटवावया । कृती ऐसी करितसे ॥१९॥ बंकटलाल अग्रवाल । पाहता झाला निश्चल । निघती वाचे त्या बोल । योगीच कोणी प्रगटला ॥२०॥ बंकटलाल नमिता झाला । चित्ती संतोष पावला । वृत्तांत तोच कथिला । देविदासा कारणे ॥२१॥ पंच पक्वान्नाचे पान । देविदास ठेवी आणून । गजानन करी सेवन । सर्व एक करूनी ॥२२॥ जना माजी दामोदर । देऊ कां म्हणे आणुनी नीर । पाणी आणावया सत्वर । जाता झाला त्या गृही ॥२३॥ समर्थांनी हास्य केले । पाणी आहाळावरी प्याले । ब्रह्म ओत-प्रोत भरले । कृतिने त्या दाविले ॥२४॥ नाही तिथे भेदा भेद । रस गोडी तसा स्वाद । सर्वाठायी ब्रह्मानंद । जाणणारे जाणती ॥२५॥

इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्यायः समाप्तः ॥   

॥ शुभं भवतु॥

 

॥ अध्याय २ रा ॥

श्री गणेशाय नमः ॥ जय विघ्नहरा गणराया । एकदंता मोरया । तव कृपे लिहावया । प्रेरणा ही मिळतसे ॥१॥ दिनानाथा दिनबंधो । कृपासागरा करुणासिंधो । सुख शांती सर्वत्र नांदो । सद्गुरू समर्था गुरुवर्या ॥२॥ करावया लीला वर्णन । स्फुर्तिदाता गजानन । पामर मी अज्ञान। कार्य करविती तेच हे ॥३॥ भाव जाणोनी बंकटाचा । कृपा हस्त शिरी त्यांचा । जमाव होता भक्तगणांचा । निघूनी जाती अकस्मात ॥४॥ समर्थ जाता निघुनी । ध्यास तोच नित्य मनी । गोड न लागे अन्नपाणी । क्षीण वृत्ती जाहली ॥५॥ काय जाहले तुजसी । भवानीराम पुसे पुत्रासी । बंकटलाल पित्यासी । सांगे खोटेच पटवूनी ॥६॥ ध्यानी मनी गजानन । व्हावे वाटे ते पूजन । शोधावया धावे मन । भक्त खरा तोच असे ॥७॥ रामाजीपंत नामे एक । ग्रामामाजी लौकिक । वृत्तिचा तो सात्विक । हेतू बंकटे कथियेला ॥८॥ वयाने असती वृद्ध । भाव त्यांचा अती शुद्ध । योगी पुरुष तो सिद्ध । असावा ऐसे वाटतसे ॥९॥ तव सुकृत सत्य जाण । तुज जाहले दर्शन । नच पुण्याई वाचून । घडे दर्शन योग्याचे ॥१०॥ रामाजीपंत देशमुख । बंकटा! दावीरे श्रीमुख । ऐक ऐक माझी भाक । सद्गुरुसी मज भेटवी ॥११॥ बंकटलाल लाचार । निघुन गेले दिवस चार । परी न सुटला निर्धार । गजाननासी शोधण्याचा ॥१२॥ गोविंदबुवा हरिदास । रहात होते टाकळीस । येऊनी शेगांवास । महादेव मंदिरी थांबले ॥१३॥ कीर्तनाचा होता वार । जमला तिथे जनभार । होताची नामाचा गजर । बंकटलाल प्रवेशला ॥१४॥ पितांबर नामे शिंपी एक । होता तोही भाविक । सांगे बंकट सकळीक । हेतू तोच मनातला ॥१५॥ ऐकुनिया समाचार । योगीया पाहती समोर । संतोष वाटे मनी फार । धाव घेती त्या ठायी ॥१६॥ जोडुनिया करकमला । माथा चरणी ठेविला । भगवंतची तया भेटला । चित्त पावला समाधान ॥१७॥ वदती महाराज तयाते । द्यावे चून भाकरीते। बंकट पितांबर आनंदी ते । इच्छा तिही पुरविली ॥१८॥ चून भाकरी खाता खाता । वदले पितांबरा जाई आता । नाल्यास पाणी अल्प असता । तुंबा भरुनी आण तूं ॥१९॥ घाण असे ते पाणी । खराब केले गुरांनी । दुसरी कडून आणतो भरूनी । वदता झाला पितांबर ॥२०॥ गजानन वदले तयासी । दूजे जल नलगे मजसी । तेच आण वेगेसी । आज्ञा करिते जाहले ॥२१॥ तुंबा बुडेल ऐसे पाणी । नव्हते कुठेही त्याक्षणी । न भरावे ओंजळींनी । ऐसेही तयांनी बजाविले ॥२२॥ तळवे पदिचे बुडतील । ऐसेच नाल्यासी होते जल । होऊनी मनी निश्चल । संत वचना पाळीले ॥२३॥ मनात करुनी स्मरण । तुंबा ठेविला असे जाण । तो तिथे खळगा होऊन । स्वच्छ पाणी दिसतसे ॥२४॥ चकित झाला पितांबर । तुंबा भरुनी साचार । उचली पाऊले झरझर । सद्गुरुराया देतसे ॥२५॥ खरा भाव खरी भक्ती । नामस्मरणी रंगली मती । तया भेटला श्रीपती । उपासना फळा आली असे ॥२६॥ मनी पावूनी – समाधान । वदती तया ऐका कीर्तन । ऐकतो मी इथे बैसून । निरुपण येता रंगात ॥२७॥ विस्मृती गोविंदबुवा झाली । गजानन वदती ओळ पुढली । अर्थ बोधही त्या वेळी । विशद करूनी सांगती ॥२८॥ बंकटलाल गृही जाता । वदे पित्यासी वृत्तांता । गृहा आपुल्या आणा आता । गजानना त्वरीत हो ॥२९॥ मानुनी बंकट वचना । घरा आणिले गजानना । सोमवार प्रदोष जाणा । दिन भाग्याचा लाभला ॥३०॥ अस्ता जाता दिनमणी । पूजिले आसनी बैसवूनी । चरणी मस्तक ठेवूनी । आशीर्वच घेतला ॥३१॥ भाव भक्तिचा नैवेद्य । अनेक पक्वान्नाचे खाद्य । सेवूनी तृप्त योगी सिद्ध । कृतार्थ करी भक्तासी ॥३२॥

 इति श्री गजानन महात्म्य द्वितियोध्यायः समाप्त: ॥

 

 

॥ अध्याय ३ रा ॥

श्री गणेशाय नमः ॥ जय जगच्चालका भगवंता । तव कृपा तीच असता । काय उणे सांग आता । भक्त तुझा सन्निध ॥१॥ तूंच सांभाळसी भार । पतितांचा करिसी उद्धार । दिनांचा घेसी कैवार । शिरी हस्त तुझा असो ॥२॥ अग्रवालाच्या घरी । गजानन वास करी । भाव जयांचा तयावरी । कृपा प्रसाद लाभतसे ॥३॥ दूर दूरचे येती जन । करिती तयासी वंदन । हास्य मुख करुणाघन । वरदान तया देतसे ॥४॥ होता ऐसे कांही दिन । उदया येता नारायण । घ्यावया सद्गुरुचे दर्शन । साधू एक पातला ॥५॥ होती तिथे गर्दी फार । म्हणून उभा राहिला दूर । मनी एकच हूरहूर । पदस्पर्श होणे शक्य नसे ॥६॥ म्लान वदनी साचार । गोसावी तो चिंतातूर । घेऊनिया माघार । जाणे तेही बरे नसे ॥७॥ भाव तयाचा जाणून । वदले ऐका गजानन । दीन वत्सल दयाघन । बोलावूनी तया आणावे ॥८॥ इच्छा एक त्याचे मनी । गांजाची चिलम भरूनी । समर्थासी अर्पण करुनी । चरणी माथा ठेवावा ॥९॥ इतक्यामाजी करिती खुण । काढी बुटी झोळीतून । नवस तुझा घे फेडून । वाया वेळ दवडू नको ॥१०॥ गोसाव्यासी हर्ष झाला । करिता झाला विनवणीला । आठव माझा राहो भला । नित्य नेमे आपणासी ॥११॥ महाराज ठेवा चिलमिसी । ऐसे वदूनी सद्गुरुसी । धन्य मानी जीवनासी । नतमस्तक तो होऊनी ॥१२॥ वेदऋचा वदती गजानन । चकीत होती वैदिक ब्राह्मण । कधी गाती शास्त्रोक्त गायन । लीला अगणीत दाविती ॥१३॥ चंदन चावल बेलकी पतिया । नित्य गाती भजना याचिया । पद हेची आवडे तया । नित्य ऐकती भक्तगण ॥१४॥ कधी वदती गण गण गणात बोते । स्वानंदाचे येता भरते । मौनधारी कधी असती ते । कधी भटकती वनी रानी ॥१५॥ जानराव नामे शेगांवात । देशमुख घराणे विख्यात । प्रसंग त्याच्या जीवनात । व्याधीग्रस्त असे तोच हो ॥१६॥वैद्यांनी टेकिले हात । उपचार करुनी बहूत । जवळ आला प्राणांत । मती कुंठीत जाहली ॥१७॥ घाबरुन गेले गणगोत । कुणी करिती आकांत । होती सारे भयभीत । स्थिती तयाची पाहुनी ॥१८॥ एक आप्त पुढे आला । तीर्थ अंगारा द्या हो याला । वचन ऐसे वदता झाला । गेला बंकट सदनासी ॥१९॥ सांगितला वृत्तांत सर्वांसी । कर जोडीले समर्थासी । वाचवा वाचवा बाबा यासी । पदतीर्था मागितले ॥२०॥ चरण तीर्थ घेऊन । भावे करुनी वंदन । परत गेला तो सज्जन जानरावा गृही तेधवा ॥२१॥ करवी तीर्थासी प्राशन । तीर्थ झाले अमृतपान । जानरावाचे चुकले मरण । साक्षात्कार हा घडविला ॥२२॥ कधी सौम्य कडक कधी । कधी वापरती भाषा साधी । कृपा होता टळती व्याधी । अनुभविती ते भक्तगण ॥२३॥ समर्थापासी भक्तएक । वृत्ती त्याची ती दांभिक । सद्गुरु दर्शना येता लोक । सांगे मीच दास असे ॥२४॥ गजानन अंतर्ज्ञानी । कोण कैसा घेती जाणुनी । फळ देती जैसी करणी । सेवकासी त्या अनुभविले ॥२५॥ विठोबा माळी नाम त्याचे । सोंग घेई साधुत्वाचे । कार्य त्याचे लुबाडण्याचे । म्हणुनी तया ताडीले ॥२६॥ लाभ हाऊन संताचा । खेळ त्याच्या तो दैवाचा । ऐशापरी शेवर त्याचा । गजानना दुरावला ॥२७॥ इति श्री गजानन महात्म्य तृतियोध्याय : समाप्त।

॥ अध्याय ४था॥

श्री गणेशाय नमः॥ तू गजानन सर्वेश्वर । नाम स्मरता विघ्ने दूर । मोदक प्रिय दुर्वांकुर । परशु हाती शोभतो ॥१॥ अनंत होती अवतार । संत महात्मे भूवर । तया कारणे साचार । सुख समृद्धि पावती ॥२॥ आता ऐका पुढील कथा । बंकटा गृही तुम्ही समर्था । बालकासवे खेळत असता । चिलम भरवी कौतुके ॥३॥ चिलीम पेटविण्या पाही । परी साधन नव्हते कांही । शोधून पाहता नाही । इलाज कुणाचा चालला ॥४॥ वैशाख शुद्ध पक्षास । अक्षय तृतियेचा तो दिवस । बालक एक वदला तयास । पहातो जाऊन शेजारी ॥५॥ जानकीराम नामे सोनार । रहात होता थोडा दूर । मनात येता विचार । तया गृही गेला असे ॥६॥ विस्तव होता बागेसरीत । बालक झाला हर्षीत । गजाननास्तव विनवित । मागे अग्नी तो तया ॥७॥ दिवस सणाचा तो जाण । परतविला बालक विस्तवावीण । हाऊनी जानकीराम क्रोधायमान । वदता झाला तया प्रती ।।८॥ व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान । वाटे देव गजानन । चिलीम पेटवावी अग्नीवीन । उगाच भोंदु वाटतो ।।९।। बालके होती चिंतातूर । मनात करिती विचार । विस्तवा वाचुनी लाचार । विन्मुख होऊनी बैसले ॥१०॥ गजानने जाणीले सर्व । सोनारास जाहला गर्व । अक्षय तृतियेचे पर्व । नच विस्तव देणे त्या मनी ॥११॥ चिलीम घेतली ती हाती । महाराज वदती बंकटाप्रती । धरी रे काडी ही वरती । चिलीम पेटविली अग्नीविणे ॥१२॥ इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला । बसविले आप्त भोजनाला । चिंचवण्याचा प्रकार भला । याच दिनी होत असे ॥१३॥ पक्वान्न वाढले पात्रात । चिंचवणे द्रोणात । पहा कैसे घडले अघटित । चिंचवण्यात अळ्या जाहल्या ॥१४॥ उठले लोक जेवणा विरहित । एकही घास ना पोटात । जानकीराम होई विस्मित । प्रत्यय तया दाखविला ॥१५॥ मी माझे दाखविले अज्ञान । आता जातो तया शरण । धावूनी धरिले चरण । क्षमा याचना मागतसे ॥१६॥ कळला तुमचा अधिकार । लोळण घेऊ पायावर । मी अजाण लेकरु पामर । कृपा दृष्टी पाही आता ॥१७॥ ठेविला हस्त तया शिरी । जाण्या सांगती माघारी । चिंचवणे होई अमृतापरी । आश्चर्य चकित तो जाहला ॥१८॥ चंदु नामे एक भक्त । रहात होता शेगांवात । आणिकही असती तेथ । सेवेमाजी स्वामीच्या ॥१९॥ चंदूस वदती महाराज । कान्होले देई मज आज । न करी इतराज । उतरंडीत तुझ्या असती ते ॥२०॥ चंदू मुकीन घरी गेला । विचारी आपल्या बायकोला । उतरंडीत असेल कां कान्हवला । असल्यास देई सद्गुरुसी ॥२१॥ होऊन गेला महिना एक । घरी जेवले असती लोक । परी बुद्धिसी सद्विवेक । पहा म्हणे तो तिजसी ॥२२॥ उतरंड उतरुनी पाहता । दोन कान्हवले येती हाता । मोद जाहला तया चित्ता । धन्य म्हणती गजानन ॥२३॥ घातले चरणी दंडवत । त्रिकाल ज्ञानी हा संत । सुख समृद्धी जीवनात । तये कृपेने लाभली ॥२४॥ माधव नामे एक ब्राम्हण । आला ग्राम चिंचोलीहून । संतचरणी होई लीन। मोक्ष साधावया कारणे ॥२५॥ अट्टाहासे करून । राहिला अन्न पाण्यावाचून । काया जाहली असे क्षीण । मरणोन्मुख तो जाहला ॥२६॥ विनविती तयालागी जन । सोड म्हणती उपोषण । महाराजही पाहती सांगून । परी न मानी कुणाचे तो ॥२७॥ रूपे धरूनी अक्राळ विक्राळ । महाराज येती त्याचे जवळ । माधव काढता झाला पळ । वाचवा वाचवा म्हणोनिया ॥२८॥ मृत्यूस भ्याला खरोखर । समर्थांनी केली विचार । प्रपंची त्यागीला आचार । निर्धार करी नामाचा ॥२९॥ ऐसे वदोनी गजानन। केले तयासी पावन । शुद्ध भाव आचरण । उपासना जना सांगती ॥३०॥

 इति श्रीगजानन महात्म्य चतुर्थोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय ५ वा ॥

 श्री गणेशाय नमः॥ सद्गुरुनाथा सच्चिदानंदा । सुबुद्धी द्यावी मतीमंदा । तव कृपे स्वानंदा । आत्मानंदा देसी तूं ॥१॥ समर्थांचे आले मनी । वसंतपूजा एके दिनी । करावी ऐसे वदोनी । कार्य तेच करविले ॥२॥ बोलाविले वैदिक ब्राह्मण । करविले त्यांचे पूजन । दक्षिणा तया अर्पण । शिष्या हाते करविली ॥३॥ वाढला शिष्य परिवार । म्हणून महाराज गेले दूर । सोडून शेगांवीचा शिवार । कानना प्रती हिंडती ॥४॥ महाराज फिरत फिरत आले । पिंपळगांवी स्थिरावले । शिव मंदिर एक भले । हेमाड पंथी पाहून ॥५॥ घालुनिया पद्मासन । बैसले समाधी लाऊन । जाहलासे अस्तमान । गुराखी गुरे नेती घरा ॥६॥ इतक्यात कुणी मंदिरात । वंदण्या आला शिवाप्रत । समर्था पाहिले तेथ । आश्चर्य वाटे मनी त्याच्या ॥७॥ कळवी वार्ता सकलास । भेट देती मंदिरास । हर्ष होई सर्वांस । सन्निध त्यांच्या बैसले ॥८॥ कुणी करिती भजन । मनो भावे पूजन । शुद्ध भाव आचरण । नैवद्यासी ठेविती पुढे ॥९॥ गुराखी गेले गांवात । समस्त जना कळवी मात । होती सकळ हर्षीत । साधुसी त्या पाहूनी ॥१०॥ राहिले तिथे काही दिवस । काळजी वाटे बंकटास । तया मनी तोची ध्यास । असतील कोठे गजानन ॥११॥ शेगांवीच्या बाजारी । खरेदी करण्या कांहीतरी । पिंपळगांवचे गांवकरी । मंगळवारी पातले ॥१२॥ भेट होई अकस्मात । बंकट आणि ते ग्रामस्थ । सांगती एकमेका प्रत । महती त्या संताची ॥१३॥ पिंपळगांवी एक अवलीया । अनेक करी तो लिलया । काय वर्णावी ती किमया । संतोष मनी बंकटाच्या ॥१४॥ बंकट येऊन विनवी तयाते । महाराज चला शेगांवाते । भक्तगण उपोशीत ते । तुम्हास्तव राहती ॥१५॥ परत आणिले शेगांवात । गजानन महासंत । वास त्यांनी तिथ । बंकटास्तव केला असे ॥१६॥ तिथून काही दिवसात । निघून गेले अडगांवात । उन्हाळा तो रखरखीत । माध्यान्ह काळी तृषीत ते ॥१७॥ पाणी न मिळे प्यावयासी । त्रास भला ग्रामस्थासी । त्रासून ते जीवनासी । कष्ट करिती रात्रंदिन ॥१८॥ अडगांवाहून आले अकोलीस । शोधीले पाणी प्यावयास । भास्कर नांगरी शेतात । महाराज येती तया जवळी ॥१९॥ घट भरला तयापासी । पाहता मागती जल त्यासी । नकार देऊनी वदला तयासी । नंगापीर तू अससी रे ॥२०॥ आमच्यासाठी असे नीर । दूरुन आणिले डोहीवर । जाई इथून सत्वर । वर्मी बोल तो बोलला ॥२१॥ महाराज किंचित हासले । निघून ते दूर गेले । विहीर पाहुनी थांबले । परी कोरडीच ती असे ॥२२॥ वृक्षातळी बसून । डोळे मिटून करिती ध्यान । सच्चिदानंद दयाघन । विनविता प्रभूसी जाहला ॥२३॥ विहिरीस फुटले पाझर । क्षणांत भरले तीत नीर । प्याले पाणी दयासागर । भास्कराने ते पाहिले ॥२४॥ धावून गेला तया पासी । क्षमा करा पामरासी । ऐसे वदून चरणासी । घट्ट धरूनी बैसला ॥२५॥ कृपा करिती तयावर । समर्थ तेचि योगीवर । देऊनिया अभयवर । सन्मार्गासी लाविले ॥२६॥ इति श्रीगजानन महात्म्य पंचमोध्याय: समाप्त॥

 

॥ अध्याय ६ वा ॥

 श्रीगणेशाय नमः ॥ सगुणावरा कृपा खरी । असतां तया काय दूरी । सदैव तूंच सहाय्यकरी । भक्तराणा उपासका ॥१॥ हाच अनुभव येई त्यासी । जो करी संत सेवेसी । ऋद्धि सिद्धि पदिच्या दासी । होऊनिया राहती ॥२॥ आता पुढील कथा सुरस । ऐका श्रोते सावकाश । भक्त नेती मळयात । कणसे खावया गजानना ॥३॥ कणसे मक्याची घेऊन । बंकट येई स्वयेहून । भाजण्या अग्नी चेतवून । सकल बैसले सभोवती ॥४॥ वृक्ष चिंचेचे अपरंपार । आगी मोहळे तयावर । होता तिथेची धूर । पसरल्या माशा चहूंकडे ॥५॥ गेले पळून सारेजण । राहिले एकटे गजानन । माश्यांनी अंग झाकून । गेले ऐसेची जाहले ॥६॥ महाराज असती शांत । मक्षिकांची न तया खंत । नवल ते पाहती भक्त । सहनशीलता ती पाहूनी ॥७॥ माशा मोहोळ सर्व तेचि । रुप स्वमेव ब्रम्ह हेचि । निज लीलेने दाविले साची । आला धावूनी बंकट ॥८॥ होऊनी गेला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । काटे शरीरी अपार । बोचलेले ते पाहती ॥९॥ बंकटलाला बोले वचन । या सर्वासी कारण । मीच एक असे जाण । दुर्दैवी मी खचितची ॥१०॥ पाहूनी बंकटाची स्थिती । परतूनी मक्षिका लाविती । कौतुक तेच दाविती । सकल जनासी तेधवा ॥११॥ काटे रुतले ते पाहून । बंकट करी पाचारण । चिमटा सोनार घेऊन । आला असे त्या ठायी ॥१२॥ अंगीचे रुतले काटे । काढू न शकती चिमटे । मीच काढून उलटे । दाखवितो ऐसे बोलती ॥१३॥ ऐसे वदुनी गजानन । श्वास धरिती रोखून । रुतलेल्या स्थलातून । कांटे वरती आणिले ॥१४॥ ऐसा पाहता प्रकार । आनंद झाला सकला फार । तो बघता अधिकार । चकित ते जन जाहले ॥१५॥ कणसे भाजुनिया भक्त । आनंदे बैसले खात । परतुनी गेले गावांत । जन समवेत समर्थांच्या ॥१६॥ महाराज येती अकोटास । भेटण्या बंधू नरसिंगजीस । गुरु कोतश्या अल्लीस । मानुनी जे असती हो ॥१७॥ नरसिंग विठ्ठल भक्त । जन्म मराठा कुळांत । ईश चिंतनी सदा रत । श्रद्धा स्थान ते जनतेचे ॥१८॥ घनदाट अरण्यांत । वास करूनी एकांत । नरसिंग राहती नित्य । तया संत हे भेटती ॥१९॥ आलिंगले एकमेका । बैसले आसनी एका । भाव न उरला परका । हितगुज करीते जाहले ॥२०॥ प्रपंच करुनी परमार्थ । साधिला हेतू तो सार्थ । ज्ञानोपासना यथार्थ । करूनी राहिला निर्दोष तूं ॥२१॥ कर्म भक्ती योग मार्ग । यांचाची घडो संसर्ग । रंगविण्या अंतरंग । हाच मार्ग सुलभ हो ॥२२॥ जैसे जैसे कथन केले । तैसेची त्याने मानिले । चरण भावे वंदिले । परोपकारी निःसंशय ॥२३॥ तुम्ही आम्ही सर्व एक । वृत्ती ठेवूनी सद्विवेक । संकटा झेलूनी अनेक । शांती नांदवी या भूवरी ॥२४॥ नित्य व्हावी भेटी गाठी । अपराध घालूनिया पोटी । गजानाना कृपादृष्टी । नित्य राहो आम्हावरी ॥२५॥ अशक्य तुम्हा नसे कांहीं । योग क्रिया जाणताही । भाव दूजा पर नाही । बंधू धाकटा मीच हो ॥२६॥ सोने जैसे बावनकसी । कमीपणा ना येई त्यासी । संत महात्मा हा गुणराशी । साक्षात्कारी तुम्हीच हो ॥२७॥ कानना प्रती दोन संत । वार्ता पसरली अकोटात । दर्शनासाठी जन तेथ । येऊ लागती क्षणात ते ॥२८॥ तितक्या माजी गजानन । आधीच गेले निघुन । दर्यापुराच्या सन्निध जाण । येऊनी राहिले शिष्यासवे ॥२९॥ भेट देती ब्रज भूषणा । वेद पारंगत विप्र जना । शिवर गावी पूजनी । अर्घ्यदाना करितसे ॥३०॥ प्रातःकाळी नदी तिरी । विप्र येता सदाचारी । पूजा पात्र तया करी । योगीराज हा भेटला ॥३१॥ उदयाचली मित्र आला । तम अवघाची निमाला । ब्रह्मानंदी डोलत बैसला । योगीया ऐशा पाही तो ॥३२॥ सूर्यासमान ती कांती । अजानु बाहु गुरुमूर्ती । ब्रजभूषण हर्षला चित्ती । अर्घ्य पाद्ये पूजिला ॥३३॥ साष्टांग केला नमस्कार । मुखे त्याची नाम गजर । नभोदरीचा भास्कर । प्रत्यक्ष भूवरी पाहिला ॥३४॥ हृदयासी तया लावून । दिले तया आलिंगन । धन्यत्व पावे जीवन । आशिर्वच तया लाभला ॥३५॥ परतुनी आले शेगांवात । उत्सव मारुती मंदिरात। नाम संकीर्तन गजरात । अन्नदाना करविले ॥३६॥ तिथेची राहती गजानन । बंकटा लावी परतून । राहण्या योग्य हे स्थान । ऐसे म्हणुनी सांगितले ॥३७॥ स्वामी राहती मंदिरी । शेगांव झाली पंढरी । भास्कर पाटील सेवा करी । गजानन तव कृपे ॥३८॥

इति श्रीगजानन महात्म्य षष्ठोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय ७ वा ॥

 श्री गणेशाय नमः॥ जय जयाजी गणराया । कथन कराया तव लीलया । तूंच लाविसी लिहावया । हात धरुनिया बालकासी ॥१॥ मतिमूमी अज्ञान । बालक तुझे हे सान । चित्ती तुजसी आठवून । लेखनाते या करितसे ॥२॥ मारुतीचा हा उत्सव । करित होते रंकराव । पाटील नामे खंडेराव । धनीक होता थोर तो ॥३॥ संत सेवा घरी खरी । त्यात लाभली जमेदारी । उत्तम कुशल व्यवहारी । बंधुही तयासी असती हो ॥४॥ लक्ष्मी नांदे सर्वांधरी । तरी सर्वच सेवेकरी । किर्ती पसरली दूरवरी । उत्सवा कारणे तीच ती ॥५॥ महादजी कुकाजी कडताजी । आप आपल्या रमती काजी । घराण्या उपदेशी गोमाजी । समर्थ तेही नागझरीचे ॥६॥ कडताजीसी पुत्र सहा । पुत्र विरहीत कुकाजी हा । जन्मदात्या पित्या परी हा । प्रेम करी सर्वांवरी ॥७॥ ऋद्धी सिद्धी राबती घरी । खंडू पाटील कारभारी । बंधू पांचजण ते जरी । सर्व मान देती तया ॥८॥ कांहीं सज्जन कांही उर्मट । करिती जनासवे कटकट । गजाननावरी रुष्ट । होऊनी छळ करिती ते ॥९॥ गजानन योगेश्वर । सहन करी साचार । जे जे कांहीं होती प्रकार । परी निरुत्तर असती ते ॥१०॥ हसण्यावरी सर्व नेती । समाधानी सदा वृत्ती । भास्कर पाटील सांगाती । सद्गुरूंच्या राही तो ॥११॥ सहावेना अपमान । म्हणून वदे तया लागून । मंदिरी न रहावे आपण । भास्कर वदे परोपरी ॥१२॥ जाऊ अकोली ग्रामासी । देती त्रास हे सकलांसी । सौख्य ना मिळे जीवनासी । उन्मत्त ते राहती ॥१३॥ गजानन वदती भास्कराते । आवर घाली मनाते । परम भक्त हे आम्हाते । सत्ताधारी जरी असती हे ॥१४॥ जमेदारासी उर्मटपण । असे खचित हे भूषण । म्हणोनीच यांचे वजन । ग्रामवासीया वर हो ॥१५॥ पाटलामाजी नामे हरी । आला हनुमान मंदिरी । महाराजा नमस्कार करी । विनवी कुस्ती खेळण्या ॥१६॥ तूं हारशील कुस्तीत । नको पाहू माझा अंत । परोपरी विनवीत । असता न मानी तो तयां ॥१॥ महाराज राहिले बसून । उठवी वदले त्या लागून । पहातो कैसा तूं पहेलवान । गर्व त्याचा हरावया ॥१८॥ पाटील हरी पुढे आला । बहूत यत्न करिता झाला । परी यश न मिळे त्याला । झुंजता हो समर्थासी ॥१९॥ गजानन वदती हरीते । नच छळावे इतराते । स्वाभिमाने कर्तव्याते । करीत राही या पुढे ॥२०॥ सद्गुरू समर्था पुण्य राशी । उपकृत केले आम्हासी । सांगितल्या परी अहर्निशी । राहू हेची सत्य असे ॥२१॥ तेव्हापासून सर्वजण । राहती नम्र होऊन । गजाननाची शिकवण । शिरसावंद्य मानिली ॥२२॥ परी होते कांहीं कुटाळ । लहर येई करण्या छळ । होऊनिया उतावीळ । संता सन्निध येती ते ॥२३॥ घेऊनी ऊसांची मोळी । पातले ते राऊळी । भावना तयांची खुळी । करिती आग्रह ऊस खाण्या ॥२४॥ अट आमची मान्य करा । करू आम्ही उस प्रहारा । वळ अंगावरी ना जरा । दिसता मानु वंद्य तुम्हा ॥२५॥ महाराज असती मौन । तेच मानिती ते प्रमाण । हाती ऊसाते घेऊन । धावून आले अंगावरी ॥२६॥ भास्करा हृदयी तळमळ । वदे नकारे करू छळ । अंगी तुमच्या जरी बळ । रीत बरवी ही नव्हे ॥२७॥ महाराज वदती बालकांना । त्रास जाहला असेल कोणा । तरी तो शमविण्या आपणा । विश्रांतीची जरूर असे ॥२८॥ सर्वां बैसविले समवेत । ऊस घेतला हातात । रस काढिला पात्रात । हातानेच तो पिळुनिया ॥२९॥ जेवढे होते तिथे ऊस । काढिला सर्वांचा तो रस । प्यावया दिला सकलांस । श्रम परिहार करावया ॥३०॥ खंडू पाटला कळली मात । जाहला असे तोही चकीत । मार्दवता ना त्या वाणीत । असे तुरे वदतसे ॥३१॥ गण्या गण्या गजानन । वाचे वदता निर्मळ मन । शुद्धभाव अंतःकरण । दूजेपणा मुळी नसे ॥३२॥ खंडूजीस नव्हते मुलबाळा । निपुत्रिक वदती सकळ । कुकाजीचा वृद्धापकाळ । चिंता मनी करितसे ॥३३॥ आळवितसे गजानना । मनी तयाच्या तीच याचना । इच्छा दर्शवी पुत्राविना । जीवन कैसे जगावे हे ॥३४॥ वदती संत गजानन । परमेश्वरी सुत्र जाण । पुत्र होईल तूज लागून । वचन सत्य ते जाहले ॥३५॥

इति श्रीगजानन महात्म्य सप्तमोध्याय: समाप्त ।

 

॥ अध्याय ८ वा॥

श्री गणेशाय नमः॥ जय जय यमुनातट विहारा मधुसूदना । पतित पावना करुणाघना । गोप सखा नंद नंदना । ब्रजभूषणा जगत्पते ॥१॥ त्रिभुवन नायका गोपगणा । क्षणही ना गमे तुझ्या विना । राधारमणा कुंजवना । धेनु चारिल्या स्वयें तूंचि ॥२॥ कृपा करी यदुनाथा ॥ नम्र चरणी तुझिया माथा । मार्ग दाखवी दीन अनाथा । हेच मागणे तुज प्रति ॥३॥ तव कृपा असता खरी । स्वानंदाच्या उठती लहरी । लिखाण करण्या हितकारी । होईल पुढती निश्चये ॥४॥ कुकाजीस आले मरण । खंडूजी झाला मनी खिन्न । भावा भावात भांडण । भाऊबंदकी सुरू झाली ॥५॥ देशमुख आणि पाटील । दुही हीच गांवातील । वाद वाढता त्यातील । विकोपास भांडण जात असे ॥६॥ ऐसाच काही घडला प्रकार । खंडू पाटला पडे विचार । गजाननावरी सर्व भार । टाकून दर्शना गेला असे ॥७॥ ठेवून पायावरी शीर । भावे केला नमस्कार । कृपा दृष्टी अम्हावर । असू द्यावी वदतसे ॥८॥ जाणुनिया भावनेसी । धरिले त्यासी हृदयासी । करीतसे सांत्वनासी । दयार्णव होऊनी ॥९॥ नाही भिण्याचे कारण । जावे आता परतून । पाटील निर्दोषी म्हणून । सिद्ध त्यांनी करविले ॥१०॥ गजानना विनंती करी । खंडू पाटील राहण्या घरी । नेता झाला सत्वरी । इच्छा त्यांची पाहुनिया ॥११॥ महाराज असतां सदनास । ब्राह्मण करिती मंत्र घोष । वसती स्थान तेलंगणास । अकस्मात येती शेगांवी ॥१२॥ मंत्र म्हणता चूक झाली । सद्गुरूंनी ती दर्शविली । वेदवाणी पटविली । निजासनी बैसुनिया ॥१३॥ वदते झाले ब्राह्मणांसी । वैदिक झाला तुम्ही कशासी । निरर्थक साधनेसी । करणे योग्य नसेची हो ॥१४॥ पोट भरण्या जरी ज्ञान । सत्य करावे विद्यार्जन । म्हणविता जरी ब्राह्मण । कर्मठ म्हणुनी वावरा ॥१५॥ स्पष्ट करुनी उच्चार । गजानन वदती ते स्वर । न लावता उशीर । चकित केले विप्रांना ॥१६॥ दिसावया परमहंस । विद्वत्ता त्या अंगी खास । द्यावया जीवन मुक्तीस । सिद्ध योगी हा असे ॥१७॥ खंडु पाटला बोलाविले । हस्ते त्याच्या दान दिले । ब्राह्मण ते संतोषिले । गेले सोडून शेगांव ते ॥१८॥ महाराजही कंटाळले । गांवात राहुन त्या भले । पाटलाच्या मळ्यात आले । शिव मंदिर ते पाहुनी ॥१९॥ मंदिरा शेजारी ओट्यावर । सावली असे थंडगार । निंबवृक्ष बहरला वर । आसन तिथे घातले ॥२०॥ जागा असे ती छान । रमले असे तिथे मन । झोपडी द्यावी रे करून । वदते झाले कृष्णाजीसी ॥२१॥ असता पाटील सेवेत । घडली गोष्ट अद्भुत । दहावीस गोसावी तितक्यात । त्या ठायी हो पातले ॥२२॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आहोत आम्ही शिष्य साचे । मानस आमुचे भोजनाचे । निवेदिते ते जाहले ॥२३॥ शिरा पुरीचे भोजन । मागते झाले सर्वजण । राहू म्हणती दिवस तीन । नंतर पुढती जाणे असे ॥२४॥ आज नसे अन्नदान । हजर असे भाकरी चून । त्याच आपण घेऊन । करा भोजन मळयात हो ॥२५॥ भोजनोत्तर बैसले जन । सुरु झाले निरूपण । कुणा न रुचले प्रवचन । शब्दच्छल तो व्यर्थची ॥२६॥ कुजबूज ती सुरु झाली । ब्रह्म गिरीच्या कानी गेली । थोर याहून गुरुमाऊली । श्रद्धास्थान अम्हासी ते ॥२७॥ गोसावी तो रागावला । समर्थापासी आला भला । चिलमी माजी गांजा भरला । भास्कर देतसे गजानना ॥२८॥ चिलम घेती गजानन । ठिणगी पडली पलंगी जाण । पेट घेई पांघरूण । धूर निघू लागला ॥२९॥ क्षणात भडकला अंगार । समर्था वदला भास्कर । उतरा खाली सत्वर । सद्गुरूनाथा गजानना ॥३०॥ तँ ते वदती भास्करासी । आणा इथे ब्रह्मगिरीसी । नैनंछिन्दन्ती श्लोकासी । सत्य करून दाखवाया ॥३१॥ गुरू आज्ञा ती मानुन । भास्कर करी पाचारण । ब्रह्मगिरी घाबरून । वदतसे तयाला नच न्यावें ॥३२॥ धरूनी त्याचा तो कर । भास्कर ओढी फरफर । गजानना समोर । आणून उभा करितसे ॥३३॥ नैनं दहति पावक । खरे करावे शब्द देख । गोसाव्यास त्या धाक । पडला असे खचितची ॥३४॥ क्षमा मागे समर्थांची । ना ओळखले मी तुम्हासी । सद्गुरुवरा गुण रासी । नत मस्तक तो जाहला ॥३५॥

इति श्री गजानन अष्टमोध्याय: समाप्त॥

 

॥ अध्याय ९ वा।

 श्री गणेशाय नमः॥ रुक्मिणीवरा पांडुरंगा । भक्तवत्सला श्रीरंगा । चरणापासी चंद्रभागा । सेवेसी तुझ्या वाहते ॥१॥ करिता तियेचे स्नान । करी पापांचे क्षालन । मनो भावे वंदुन । भक्तचिंतनी रमती ते ॥२॥ मज द्यावे वरदान । लिहवी हे गुणगान । सिद्ध पुरुष गजानन । भाव सुमने वाहतो ॥३॥ परीस स्पर्शता लोहाते । सुवर्णच तो करी त्याते । संत कृपा दान ते । कल्याण भक्तांचे करितसे ॥४॥ म्हणून मागणे हे सदया । दया असावी प्रभूराया । जड जीवा या ताराया । महिमा सद्गुरुचा वर्णवी ॥५॥ एकदा शेगांवी टाकळीकर। गोविंदबुबा कीर्तनकार । हरिदास हे असती थोर । शिव मंदिरी पातले ॥६॥ लौकिक होता मोठ्यांचा । जिर्णोद्धार मंदिराचा । धनिक तो शेगांवचा । भाविक तोही सत्य असे ॥७॥ मंदिरात येता कथेकरी । घोडा बांधिला सामोरी । येता जवळी लाथ मारी । चावा तोचि घेत असे ॥८॥ स्थिर न राही क्षणभर । तटा तटा तोडी दोर । पळून जाई वारंवार । जवळ न येऊदेई कोणा ॥९॥ लोखंडाच्या साखळया । असती बांधावया भल्या । विसरून त्या राहिल्या । टाकळी नामे ग्रामासी ॥१०॥ रात्र झाली असे फार । झोपण्या गेले कीर्तनकार । चोहिकडे पसरला अंधार । टीव टीव टिटव्या करिती त्या ॥११॥ भयाण वाटे परिसर । कुणी न दिसे रस्त्यावर । तितक्या माजी योगेश्वर । येते झाले त्या ठायासी ॥१२॥ घोडा होता उभा शांत । महाराज झोपले पायात । भजन वाचे गण गणात । वृत्ती रंगुनी गेली असे ॥१३॥ शंका येई एक मनी । घोडा वाटे जाईल सुटोनी । म्हणुनी गोविंदबुवा मधुनी । येऊन पाहती घोड्यासी त्या ॥१४॥ घोडा होता उभा शांत । नवल वाटले तया प्रत । जवळ जाऊनी पहात । दृष्टी पडले गजानन ॥१५॥ केला समर्थासी नमस्कार । ठेवूनी पायावरी शीर । चित्ता करूनिया स्थिर । स्तवन मानसी करितसे ॥१६॥ भाग्य तेची फळा आले । खट्याळ घोड्यासी आकळीले ॥(श्लोक)'सखा सोयरा तूं असे या दिनाचा । उजळोनी देई मार्ग हा जीवनाचा" ॥१७॥ जोडोनिया कर । बुवा निघाले सत्वर । नित्याचा व्यवहार । करावया कारणे ॥१८॥ दूरदूरचे येती जन । गजाननाचे घ्यावया दर्शन । मनी पावती समाधान । प्रसाद लाभतां संताचा ॥१९॥ बाळापुरचे दोघेजण । सद्गुरु चरणी होती लीन । नवस केला तो विसरून । गेला ऐसे जाणवले ॥२०॥ दुसऱ्याही वारीसी येता जाण । गांजा गेले विसरून । समर्थ तेच बोलून । दाखविते हो जाहले ॥२१॥ बाळकृष्ण नामे रामदासी । रहात होता बाळापुरासी । सज्जनगडी दर्शनासी । नित्य नेमे जात असे ॥२२॥ पत्नी राही ती सांगाती । चंदनाच्या चिपळ्या हाती । नाम स्मरणी रंगुनी जाती । ऐसा नित्य क्रम असे ॥२३॥ सदा करी अन्न दान । अतिथी विप्रा तोषवून । निजग्रामी येती परतून । पुरूषार्थासी साधण्या ॥२४॥ वृद्धापकाळ पुढती येता । होईल कैसे सद्गुरूनाथा । सेवा तुमची न होणे आता । शक्य वाटते या मनीं ॥२५॥ विचार ऐसा येता मनीं । वृत्ती होई दीन वाणी । अश्रु तळपती लोचनी । ध्यान समाधी लागली ॥२६॥ स्वप्नी येऊनी रामदास । वदते झाले बाळकृष्णास । घरीच करणे उत्सवास । दर्शनास येईन मी ॥२७॥ तेव्हा पासून बाळापुरा । उत्सव नवमीचा होई साजरा । नववे दिवशी दोन प्रहरा । दर्शन देती गजानन ॥२८॥ वाट पाहता समर्थाची । दिसे मूर्ति तीच साची । ऐशापरी आस त्याची । पुरविते ते जाहले ॥२९ ।। वचनाची त्या झाली पूर्ती । गजानन ते निघून जाती । समाधान पावला चित्ती । बाळापुरासी विप्र तो ॥३०॥ गजानन रूप रामदास । श्रद्धा भावे दर्शनास । लागो मना तोच ध्यास । अगाध लीला तयाची हो ॥३१॥

इति श्री गजानन महात्म्य नवमोध्यायः समाप्त॥

|| अध्याय १० वा॥

श्री गणेशाय नमः॥ अनंत रूपा नारायणा । तूंच रक्षिसी भक्तगणा । नच कोणी तुझ्याविना । जगज्जिवना मज आता ॥१॥ देवाधि देव गजानन । वदे गाती गुणगान । चरणी भावे वंदुन । कृपा प्रसाद मागतसे ॥२॥ गजाननाच्या आले मनी। रहावे अमरावतीस जाऊनी। आत्माराम सदनी। येऊनिया ते राहिले॥३॥ आत्माराम पुरुष थोर । होता त्याचा अधिकार । ग्रामामाजी उदार । प्रभु घराणे असे त्यांचे ॥४॥ येता गृही गजानन । घातले तया मंगल स्नान । केले भक्तिभावे पूजन । हार कंठी घातला ॥५॥ पंच पक्वान्नाचे भोजन । देऊनी केले तृप्त मन । दक्षिणा ती देऊन । चरणी मस्तक ठेविले ॥६॥ दर्शना कारणे येती जन । दर्शन घेता समाधान । कितिकांना ते चरण । स्पर्श करावया मिळेचि ना ॥७॥ अती जाहली असे दाटी । करिती भाविक लोटा लोटी । घालावया हार कंठी । भाग्याविणे न घडत असे ॥८॥ जिथे जिथे इच्छा होई । गजानन स्वयें जाई । तया लागी पुण्याई । खचित लाभावी लागते ॥९॥ खापर्डे गृहस्थ यांचे घरी । महाराजांची गेली स्वारी । वकिली सनद हीच खरी । अपार संपत्ती देत असे ॥१०॥ षोडशोपचारे झाले पूजन । आशिष देती गजानन । सदन झाले ते पावन । समर्थ चरण लागताची ॥११॥ ज्यांच्या ज्यांच्या मनी भाव । तया भेटला हा देव । कुणी असो रंकराव । सकल समान हो त्या ठायीं ॥१२॥ राहून तिथे काही दिवस । महाराज येती शेगांवास । त्याच ठायी मुक्कामास । मंदिरी शिवाच्या राहिले ॥१३॥ कळले असे पाटलास । कृष्णाजी येई दर्शनास । विनवी चालण्या मळयास । परी तिथेची ते राहिले ॥१४॥ सर्वांचे जाणुनी मन । केले असे समाधान । होईल आपुली इच्छा पूर्ण । ऐसे वाचे वदले ते ॥१५॥ हरी पाटील नारायण । तैसे इतरही सर्वजण । होती पदी त्या लीन । कृपा प्रसाद लाभावया ॥१६॥ सखाराम असोलकरासी । पाटील मागती जागा मठासी । पटले ते महाराजांसी । पावन भूमि तीच हो ॥१७॥ परशराम सावजी भास्कर । गणेश आप्या पितांबर । अनेक भक्त असती थोर । महाराजा सान्निध सेवेसी ॥१८॥ बाळाभाऊ भक्त खरा । सोडूनिया घरा दारा । गजाननाचा आसरा । ध्यावया तिथेची राहिला ॥१९॥ स्वार्थ साधू भक्तगण । महाराजा सांगती विनवून । द्यावे यासी घालवून । नच ठेवावे जवळी हो ॥२०॥ गजानन घेती हाती काठी । मार मारती भास्करा पाठी । सत्य ठरली ती कसोटी । वळ ना उठता अंगावरी ॥२१॥ कळला त्याचा अधिकार । लाभला शिष्य हाची थोर । जैसा सुवर्णा सोनार । कस लावूनी पहातसे ॥२२॥ बाळापुरचा सुकलाल । मारवाडी अग्रवाल । त्याची गाय खट्याळ । मारकुंडी फार असे ॥२३॥ मोकाट फिरे गांवात । धान्य खाई दुकानांत । जन जाहले अती त्रस्त । हाती न सापडे कुणाच्याही ॥२४॥ कुणी म्हणती या गायीला । घेऊन जावे शेगांवला । जसा घोडा शांत झाला । कृपा गजानन करतील ॥२५॥ फासे टाकूनी धरली गाय । गाडीत घातली बांधीले पाय । शेगांवी न्यावया उपाय । ग्रामस्थांनी केले असे ॥२६॥ दृष्टी पडता गजाननाची । वृत्ती पालटली धेनुची। दोरखंडे सोडण्या तिची । महाराज स्वयें येती पुढे ॥२७॥ खाली घालुनिया मान । चाटु लागली ती चरण । अग्रवाल करी दान । गजाननासी त्या गायीचे ॥२८॥ कारंज्याचा लक्ष्मण । विप्र एक धनवान । पोटी रोग असह्य जाण । किर्ती ऐकून येतसे ॥२९॥ पत्नी तयाची जाई शरण । गजानना मागे वरदान । पतीचे वाचवा प्राण । शमवाया ह्या यातना ॥३०॥ आंबा होता समर्था करी । तोच फेकला अंगावरी । खाया देई पतीस सत्वरी । व्याधी मुक्ततो व्हावया ॥३१॥ आज्ञेचे करी पालन । झाला रोग निवारण । कृपाळू तो दयाघन । गजानन धन्वंतरी ॥३२॥

इति श्री गजानन महात्म्य दशमोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय ११ वा

॥ श्री गणेशाय नमः॥ अलौकिक ही तुझी कृती । सुरनर तुजला भावे पूजिती । ब्रह्मानंद श्री गुरु मूर्ति । सगुण उपासक गजानन ॥१॥ भोलानाथ गंगाधर । गिरिजापती उमाशंकर । हरहर शंभो हे महेश्वर । करुणा सागर विश्वनाथ तूं ॥२॥ महाराजांचा श्वान होते पिसाळलेले । तेणे लोक तेच भ्याले । उपचार भास्कारावरी केले । सर्व ठरले निरर्थक ॥४॥ भास्कर म्हणे गजानन । हाच माझा वैद्य जाण । मजला जावे घऊन । तेच करणे योग्य असे ॥५॥ गजाननापासी तया नेले । वृत्तांतासी ऐकविले । हसून महाराज वदले । भोग भोगावा तो लागेची ॥६॥ प्रारब्ध भोग तो होता । झाला तो कुत्रा चावता कृपादृष्टी ती होता । मृत्यू टळे भास्करासी ॥७॥ केली होती संत सेवा । तोच लाभला त्यासी मेवा । अंतरीच्या शुद्ध भावा । पुरावा हाची योग्य असे ॥८॥ शिवरात्रीसी त्र्यंबकेश्वर । दर्शना येती योगेश्वर । शिष्या सहित साधूवर । पंचवटीसी राहती ॥९॥ राहिले तिथे काही दिवस । परतुनी आले शेगांवास । भेटूनी शामसिंगास । येऊ म्हणती अडगांवा ॥१०॥ असतां उत्सव रामनवमी । शामसिंग शेगांव ग्रामी । येताच संधी नामी । गजानना नेई अडगांवा ॥११॥ असता तिथे समर्थ स्वारी । भक्तगणांचा कैवारी । भास्करास त्या ताडण करी । अपराधी तो म्हणोनिया ॥१२॥ जन वदती सोडा तयासी । चुकला जरी कर्तव्यासी । दृढभाव त्या चरणापासी । सद्गदीत तो जाहला ॥१३॥ बाळाभाऊस देववी मार । म्हणुनीच घडला हा प्रकार । करा याचा काही विचार । गजानन वदले कौतुकें ॥१४॥ पाटील भास्करा कारणे । दोन दिवस इथे राहणे । इहलोक सोडूनी जाणे । लागेल ऐसे संत वदती ॥१५॥ संतवाणी खरी झाली । मुक्ती भास्करा मिळाली । द्वारकेश्वरा जवळी । समाधी तया देवविली ॥१६॥ अन्नदान भंडाऱ्यासी । अडगांवी ग्राम वासियांसी । घ्यावया प्रसादासी । कावळे येती अती तेथे ॥१७॥ त्रस्त होती जन हाकता । कावळे ते अन्न खाता । कृपाच तंव दयावंता । क्षणांत तया पाठविले ॥१८॥ वदले काय ते संत ऐका । आज आले उद्या नका । नका देऊ जना मोक्का । तुम्हा ताडन करावया ॥१९॥ तेव्हापासून नच आले । कावळे त्या स्थानी भले । संत वचन मानीले । महानता तीच संताची ॥२०॥ पडला असतां दुष्काळ । नद्या विहिरीत नव्हते जळ । हताश होती जन सकळ । सुरुंग लाविले विहिरीसी ॥२१॥ आंत होता कारागीर । खडक फोडेना ती पहार । जाहला तो लाचार । उपाय त्याचा चालेना ॥२२॥ सुरूंगाची ती किमया । खडक फोडण्या त्या ठाया । एरंड पुंगळ्या सोडाया । काम तिथे हो चालले ॥२३॥ गणु नामे कारागीर विहिरी माजी धरूनी धीर । बसला असतां फुटला बार । स्फोट भयंकर जाहला ॥२४॥ गजानन कृपे वाचला । गणु सुखरूप राहिला । कपार तोंडी धोंडा भला । येऊन पडला त्या ठायी ॥२५॥ गजाननाचा धावा केला । म्हणुनीच गणु तो वाचला । ऐसा योगी लाभला। भक्ततारण्या संकटी ॥२६॥ 

इति श्री गजानन महात्म्य एकादशोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय १२ वा।

श्री गणेशाय नमः । जय अंबे रेणुके माते । छत्र शिरावर असता ते। काय उणे त्या भक्ताते। लेकरे तुझे ते सर्वची ॥१॥ कुणी ज्ञानी कुणी अज्ञान। सकला मानिसी तूं समान । भवाब्धी माजी तारून । नेसी माते तूंच तया ॥२॥ सकल चिंता वाहसी । मंगल दायिनी तूं होसी । हांके सरसी धावसी । रक्षण करिसी सकलांचे ॥३॥  तूंच करवी सेवेते । दीन दयाळे मम हाते । कार्य चालवी हे पुढते । आशीर्वच तव राहू दे ॥४॥ अकोल्यासी बच्चुलाल । रामभक्त अग्रवाल । सुटता तयाचा तोल । गजानना तूं सावरीसी ॥५॥ महाराज येता अकोल्यास । वदते झाले बच्चुलालास । सावकार असता तूं खास । चिंता कासया करितोसी ॥६॥ जे जे आहे तुझ्या मनी । आले असे ते मम ध्यानी । करवूनी घेईल कैवल्य दाणी । सत्य हेची मान तूं ॥७॥ अससी खरा दानशूर । घडावे वाटते कार्य थोर । रामाचे बांधी मंदिर । इच्छा हीच तव असे ॥८॥ ऐकता सद्गुरुवाणी । बसविले तया आसनी । मनोभावे तया पुजूनी । आशिर्वाद तो घेतला ॥९॥ महाराजा दिधले दान । ताटी भरुनी सुवर्ण । गजानन लाविती परतून । कार्य तयाचे ते करविण्या ॥१०॥ पितांबर तो शिष्य त्यांचा । असे शिंपी जातीचा । लाभ त्या संत सेवेचा । भाग्य त्याचे थोर ते ॥११॥ महाराज सांगती जाण्या दूर । दुःखी तो जाहलां फार । सुटला वाटे आधार । आज्ञा म्हणुनी तो जातसे ॥१२॥ कोंडोली नामे ग्रामासी । निघाला असे तो प्रवासी । सुकल्या आम्र वृक्षा पासी । यऊनिया तो बैसला ॥१३॥ ध्यानी मनी गजानन । नित्याचे ते चिंतन । गजाननाचे भजन । मनो भावे तो करीत असे ॥१४॥ मुंगळे असती तिथे फार । म्हणुन चढला झाडावर । जिकडे तिकडे अंधार । वनांतरी तो राहिला ॥१५॥ उदया येता दिनमणी । पाहिले तया गुराख्यांनी । वार्ता कळविली जाऊनी । ग्रामवासी जनतेसी ॥१६॥ तया पाहावया जमले जन । मुखे चाले नामस्मरण । गजाननाचा शिष्य जाण । कळून आले सकलांसी ॥१७॥ खरे खोटे जाणण्यासी । परिक्षाच ते घेता त्याची । सांगती हरित करण्यासी । वृक्ष तोचि पाटलाचा ॥१८॥ सद्गुरुचे करितां स्मरण । पल्लवी फुटली ती नवीन । पाहता सकल ते जन । करिती वंदन पितांबरासी ॥१९॥ केला तयाचा बहुमान । गाती जन गुणगान । सकलांसी श्रृत वर्तमान । गजानन शिष्य सत्य असे ॥२०॥

इति श्रीगजानन महात्म्य द्वादशोध्यायः समाप्त॥

 

अध्याय १३ वा।।

 श्री गणेशाय नमः ॥ संत महात्मे या भूवरी । भक्तगणांचे कैवारी । सगुण रूप हे ईश्वरी । जन कल्याणास्तव असे ॥१॥ गोप सखा श्रीहरी । पावा अधरी तो धरी । धेनु चारिता वनांतरी । वत्स न करिती पयपाणा  ।।२।। करी आता कृपादान । कोण मज तुजवाचून । देई मज अवधान । सेवा कार्य हे कराया ॥३॥ कुणी सज्जन कुणी दुर्जन । कुणी नास्तिक भाविक जन । मठा कारणे जमविती धन । सद्गुरु चरणी भाव असे ॥४॥ गजानन थोर संत । लीला त्यांच्या अघटीत । येईल जे मनांत । तेच करुनी ते दाविती ॥५॥ तेजोमय दिनमणी । गजानन कैवल्य दाणी । तिमिरा घालवोनी । प्रकाशमय अवनी करितसे ॥६॥ समर्थ बसती ज्या ठायी । परकोट उभारून तो होई । अन्न छत्र पाणपोई । तया ठायी नित्यची ॥७॥ सद्गुरू पाहती काज । सोहळा पहावया आज । शेगांवी जाता सहज । पहावया मिळतसे आपणासी ॥८॥ भक्त गणांच्या जे मनी । तेच आले सर्व घडोनी । सहाय्य केले सरकारानी । ज्या ज्या परी गरज भासे ॥९॥ येता कांही अडथळे । समर्थ वदता ते टळे । गजानन कृपेमुळे । सहज साध्य ते होतसे ॥१०॥ इथे होती चमत्कार । घडले कांही जे प्रकार । केले असती सादर । संत वचना मानुनी ॥११॥ सवडद नामे गांवात । गंगा भारती होता रहात । कुष्ठरोगी अती त्रस्त । संत दर्शना तो पातला ॥१२॥ डोके ठेविले पायावर । चापट बसली गालावर । उभा ठाकला जोडीले कर । कृपा सद्गुरुची व्हावया ॥१३॥ लाथा बुक्क्या थापडा खाई । संत गजानन कृपा होई । थुकले महाराज त्या ठाई । मलम मानुनी तो लाविला ॥१४॥ घाण वाटली ती जनाला । जन बोलती टोचुनी त्याला । खंत नसे त्या मनाला । व्याधी रहित तो जाहला ॥१५॥ गंगाभारती वदे जना । व्यर्थ न करावी कुचंबणा । थुकी नसे हा मलम जाणा । विनम्र भावं सांगतसे ॥१६॥ स्नानास बसती गजानन । तेथील माती ती आणून । तिचेच करूनी लेपन । पूर्ववत तो जाहला ॥१७॥ सुगंध असे मातीस । भारती सांगे त्या जनास । सत्य न वाटे कुटाळास । प्रत्यय तयांसी दाखवला ॥१८॥ कुटाळ तो शरण आला । वंदिले गजानन चरणाला । गर्व त्याचा तो निमाला । संत कृपेने सहजची ॥१९॥ नित्य नेम गोसाव्याचा । एकतारीवर भजनाचा । त्याच नामी रंगली वाचा । संतुष्ट गजानन ते जाहले ॥२०॥ कुष्ठ रोगी झाला बरा । पत्नी आली न्यावया घरा । त्यागीले त्याने संसारा । काळ तिथेची घालविला ॥२१॥ अनेक भक्ता किती तरी । चमत्कार होती नानापरी । लिहावे ऐसे वाटे जरी । ग्रंथ वाढेल त्या कारणे ॥२२॥ रोग साथीचे जरी येती । गजानन तया निवारिती । मनी असता श्रद्धा भक्ती । कल्याण तयाचे होत असे ॥२३॥ धरी मनीं शुद्ध भाव । कृपा करी सद्गुरुराव । स्थान पूज्य शेगांव । विदर्भ पंढरी सत्य जाणा ॥२४॥ रोग साथीचे येती । गजानन तया निवारिती । मनी असतां भक्ती । दर्शना जाती जन शेगांवी ॥२५॥ शामसिंग मुंडगांवचा । लाभ घेण्या दर्शनाचा । मार्ग धरी शेगांवचा । दरबारी त्या पातला ॥२६॥ चरणावरी ठेविला माथा । वदता झाला सद्गुरुनाथा । मुंडगावी चालावे आता । इच्छा मम ही पुरवावी ॥२७॥ महाराज ग्रामी त्या जाती । चतुर्दशी रिक्त ती तिथी । अन्न दान करावे चित्ती । बेत तयाने ठरविला ॥२८॥ महाराज वदती पौर्णिमेला । जेवू घाली सर्वांला । न मानिती वचनाला । सिद्धता ती जाहली ॥२९॥ भोजनासी जमले जन । पात्रावर वाढले अन्न । आकाश ते आले भरून । मेघ गर्जना जाहल्या ॥३०॥ वर्षा झाली जोरदार । अन्नाचं केल मातेरं । शामसिंग तो लाचार । शरण गेला गजानना ॥३१॥ भंडारा झाला दुसरे दिवशी । प्रसाद मिळाला सर्वांसी । संतोष पावला मानसी । कृपा प्रसाद लाभला ॥३२॥ मुंडगावचा पुंडलीक । भाकरे नांवाचा भक्त एक । असे अती भाविक । वारी शेगांवाची नित्य करी ॥३३॥ वारीसी जाता ज्वर आला । रस्त्याने ना चालवे त्याला । आळवी मनी सद्गुरुला । ग्राम शेगांव ते गाठले ॥३४॥ गजानना घातले दंडवत । पुंडलिक होई व्याधी रहित । आनंदले त्याचे चित्त । गंडांतर टळले खचितची ॥३५॥

इति श्रीगजानन महात्म्य त्रयोदशोध्यायः समाप्त।

 

॥ अध्याय १४ वा॥

श्री गणेशाय नमः॥ जय जय राघवा रामराया । सती कौसल्या तनया । दीन वत्सला तव पाया । भाव पुष्पा या वाहतसे ॥१॥ अजानु बाहू धनुर्धर । अससी कृपेचा सागर । दूष्ट संहारण्या अवतार । भार वाहसी भक्तांचा ॥२॥ कृपा करी रघुनाथा । अनाथांच्या नाथा । सुरस लिहावी कथा । दासाच्या या हातुनी ॥३॥ खेर्डा ग्रामी एक ब्राह्मण । असे सदाचार संपन्न । प्रपंच परमार्थ साधुन । कार्य आपुले करितसे ॥४॥ घरी येती पाहुणे फार । घेई अवघ्यांचा समाचार । सर्वांवरी परोपकार व्रत । हेची तो चालवी ॥५॥ कर्जाचा वाढला भार । येई घरी सावकार । परी फेडण्या कर्ज लाचार । जीवनासी तो त्रासला ॥६॥ मनी करूनी विचार । सोडीले तयें घरदार । तीर्थाटना सत्वर । जावया कारणे निघतसे ॥७॥ स्टेशनावर घेता तिकिटासी । गृहस्थ भेटला एक त्यासी।  वदला तया कुठे जासी । स्थिर चित्ता ठेव तू ॥८॥ तीर्थाटना जरी जासी । प्रथम वंदी संतासी । गजानन असता शेगांवासी । थोर महात्मा खचितची ॥९॥ विचार न करी अंतरी । जाई आता सत्वरी । उगीच भलते कांहीं तरी । मनी चिंतणे बरे नसे ॥१०॥ अकस्मात भेटला ब्राह्मण । मनी वाटे असेल कोण । गेला असे गोंधळून । आला असे तो शेगांवा ॥११॥ दर्शन घेतले महात्म्याचे। कथीले सर्व तया साचे। हेतू जे जे असती मनिंचे। शंका निरसन जाहली ॥१२॥ स्टेशनावर भेटले कोण । घेतले कां तया जाणून । जा आता घरी परतून । हेच सांगणे तुज असे ॥१३॥ आत्महत्त्या करू पाहसी । होते जाणे हिमालयासी । त्रासुनिया जीवनासी । करणे हे कां योग्य असे ॥१४॥ धन आहे मळ्यासी । बाभळीच्या त्या बुडासी । नशीब तुझे उदयासी । येण्या संधी ही पातली ॥१५॥ होता रात्रीचे दोन प्रहर । खोदण्या जाई सत्वर । जा न करावा उशीर । परतुनी तया लाविले ॥१६॥ जैसे तया सांगितले । तैसे त्या विप्रें केले । सत्य वचन ते झाले । द्रव्य घट तो सांपडला ॥१७॥ शेगांवी तो परत गेला । दान धर्म बहू केला । प्रेमानंदे नाचला । कृपा प्रसादे संताच्या ॥१८॥ सोमवती पर्वकाळ पाहून । करावे नर्मदा स्नान । सवे घ्यावे गजानन । भक्तगणां वाटतसे ॥१९॥ बंकटलाल मारुती चंद्रभान । सवे तयांच्या गजानन । ऐसे अनेक भक्त गण । ओंकारेश्वरी त्या पोहचले ॥२०॥ नर्मदेचे अवघे घाट । स्त्री पुरुषांनी भरले दाट । ना मिळे जावया वाट । गर्दी अपार ती लोटली ॥२१॥ नावे माजी बसून । निघाले ते सर्वजण । खेडीघाट स्टेशन । जवळ तेची करावया ॥२२॥ नर्मदच्या मध्यंतरी । नाव आदळली खडकावरी । खोच पडली तीज भारी । आत पाणी ते शिरले ॥२३॥ घाबरले सर्वजण । परी शांत होते गजानन । मुखे चालले नामस्मरण । गण गण गणात बोते हो ॥२४॥ आम्ही न आपले ऐकले । म्हणुनि का ऐसे झाले । अपराधी आम्ही आहोत भले । वाचवा वाचवा प्राण हे ॥२५॥ स्तवन केले नर्मदेचे । गजाननाने स्वये वाचे । पाणी ओसरले साचे । नाव पूर्ववत जाहली ॥२६॥ नर्मदेने घेतला वेष । कोळीण रुप धरी खास । लावीली नाव तीरास । अवघ्यांनी ती पाहिली ॥२७॥ चित्रकुटचे नाथ माधव । शिष्य त्यांचे सदाशीव । तात्या असे टोपण नाव । दर्शनास आले शेगांवी ॥२८॥ गजानन बैसले जेवणास । पाचारी नाथ शिष्यास। उशीर झाला तुम्हास। येण्यास हो या ठायासी॥२९॥ माधवनाथ गुरु त्यांचे। भाग्य लाभले भोजनाचे । राहिले सेवन तांबुलाचे । विडा नेऊनी द्या त्यांना ॥३०॥ वानबळे नाम त्यांचे । शिष्य माधवनाथाचे । स्मरण करिता त्यांचे । भेट हीच हो साक्षात ॥३१॥ 

इति श्रीगजानन महात्म्य चतुर्दशोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय १५ वा॥

श्री गणेशाय नमः ॥ जय जय व्यंकटेशा वासुदेवा । मन मोहना हे माधवा । शेष शयना केशवा । गोविंदा दामोधरा नमितो तुज ॥१॥ करी पूर्ण मनोरथ । तूची हाकिला अर्जुन रथ । अनाथांचा तूं नाथ । सखा तूची भाविकांचा ॥२॥ असे तूज नमस्कार । हीन दीन मी पामर । जन कल्याणास्तव अवतार । अनंत रुपे नटलासी ॥३॥ भक्त वत्सला दयाघना । दावी सखया तव चरणा । नामी रंगवी ही रसना । कवणाते या गोड करी ॥४॥ टिळक बाल गंगाधर । राजकारणी अति चतुर । कीर्ति जाहली दूरवर । स्वातंत्र्य संग्राम गाजविला ॥५॥ लोकमान्य नर केसरी । जनतेचे हे पुढारी । शस्त्र लेखणी हीच खरी । इंग्रजांसी झुंजला ॥६॥ शिव जयंती उत्सवासी । टिळक आले अकोल्यासी । पाचारण केले गजाननासी । मंचकावरती बसविले ॥७॥ खापर्डे दामले कोल्हटकर । विद्वान वक्ते असतीं थोर । जन समुह लोटला अपार । भाग्य खचित त्या नगरीचे ॥८॥ कोणा वाटे गजानन । मध्येच गातील भजन । परी धरूनी ते मौन । सभे माजी ते बैसती ॥९॥ राष्ट्रोद्धार हाच खरा । करवी हाते गंगाधरा । भोगीले ज्याने कारागारा । स्वातंत्र्य लढ्या कारणे ॥१०॥ पटवर्धन अप्पा साचे । राहणारे ते आळंदीचे । स्नेही तेच टिळकांचे । आले असती उत्सवासी ॥११॥ वर्‍हाड प्रांती अकोल्यासी । सभा झाली वैशाख मासी । अक्षय तृतीयेच्या दिवशी । सुयोग पर्वणीचा साधला ॥१२॥ सभा यशस्वो झाली खरी । टिळक गेले कारागारी । टिकास्त्र सोडिले इंग्रजांवरी । शुद्ध भाव तो अंतरीचा ॥१३॥ भूत भविष्य वर्तमान । जाणती हे गजानन । जन असती हे सामान्य । कर्तव्याची ना जाण तया ॥१४॥ टिळक असता कारागारी । गजानन देती प्रसाद भाकरी । खापर्ड्यासी वदती जा सत्वरी । टिळका कारणे ती द्यावया ॥१५॥ मुंबई गेले कोल्हटकर । प्रसाद घेऊनी भाकर । टिळक न करिती अव्हेर । कृपा प्रसाद तो स्वीकारिला ॥१६॥ मंडाल्याच्या तुरुंगात । गीता रहस्य लिहिला ग्रंथ । गजाननाचा वरद हस्त । शिरी खचितची राहिला ॥१७॥ कोल्हापूरचे करवीर । गोविंद सूत श्रीधर । काळे उपनांव साचार । गरीबीतच ते वाढले ॥१८॥ शिक्षण तेही जेम तेम । परी बुद्धी ती उत्तम । यश धंद्यामाजी हा भ्रम । द्रव्यार्जनाची नच शक्यता ॥१९॥ टोगो यामा दोघेजण । मित्र यांचे खचित जाण । सवे यांच्या विद्यार्जन । थोर गुण हा लाभला ॥२०॥ नसे कुणाची ती मदत । घरी गरीबी अत्यंत । तया मनी हीच खंत ।  मित्र एक भंडाऱ्यासी॥२१॥ श्रीधराने पत्र टाकून ॥ सविस्तर कळवी वर्तमान । मनात होते ते कथन । मन्सेसी त्या निवेदिले ॥२२॥ मन्से शिक्षक साचार । श्रीधरावरी प्रेम अपार । मजकूर वाचूनी करी विचार । मनी निर्धार तो करीतसे ॥२३॥ ठरविती दोघे कोल्हापूर । शहर असे ते गुलजार । पत्रो पत्री व्यवहार । निश्चित तो जाहला ॥२४॥ घ्यावे गजाननाचे दर्शन । शेगांवी त्या जाऊन । रेल्वे मार्गावर ते जाण । भावना अंतरीची जाहली ॥२५॥ सद्गुरु चरणी ज्यांचा भाव । पैल तीरा लावी नाव । स्टेशन ते शेगांव । गाठिले हो त्या दोघांनी ॥२६॥ आले दोघे ते मठात । गजानना जोडीले हात । जाणिती सकल ते संत । आशीर्वच तयासी लाभला ॥२७॥ विचार न करणे आता । शांत ठेवा आपुल्या चित्ता । सुयश तया चिंतीता । कार्य सफल ते जाहले ॥२८॥ लौकिकास पात्र श्रीधर । ग्राम लाभे कोल्हापूर । संत साक्षात परमेश्वर । सुपंथ भक्तास दाविती ॥२९॥ दर्शनाचा योग येता । उचित घडले तत्वता । दयाघन सिद्ध हस्ता । शिरी आपल्या ठेवा सदा ॥३०॥

इति श्रीगजानन महात्म्य पंचदशोध्यायः समाप्त॥

 

॥ अध्याय १६ वा॥

 श्री गणेशाय नमः॥ परशु असे शस्त्र हाती । कुमार जमदग्नीचा म्हणती सपरशुराम माता ती । रेणुका ती मृगाचली ॥१॥ ताडीले तिने दुष्टांसी । संरक्षण दिले द्विजांसी । परी आता कां निष्ठुर होसी । माते अव्हेरिसी बालका ॥२॥ गजाननाचा भक्त एक । नाम त्याचे पुंडलिक । महान हा भाविक । मुंडगांवी रहातसे ॥३॥ शेगांवाची करी वारी । गजानना ध्यायी अंतरी । कृपा तीच तयावरी । सद्गुरुची त्या जाहली ॥४॥ भागाबाई नामे ठाकरीण । रहात होती तिथे जाण । दंभाचार माजवून । भोंदित असे सकलांना ॥५॥ वदली ती पुंडलिका । जन्म तुझा रे फुका । शेगांवासी जासी कां? सद्गुरु मानिसी वेड्यासी ॥६॥ ताप तुझा झाला बरा । म्हणुनी करिसी येरझारा । खातो कुणाच्याही घरा । पिशापरी तो राहतो ॥७॥ गुरु पाहिजे ब्रह्म ज्ञानी । वेदांतासी जाणुनी । नित्य जो रंगे हरिचिंतनी । गुरु तोच खरा जाणावा ॥८॥ भागाबाई जशी सांगे । नादी तिच्या तसा लागे । अंजनगावी तिच्या संगे । जाऊ म्हणे किर्तनासी ॥९॥ केजाजीच्या शिष्याते । गुरु करणे ठरले होते । ऐसे मनी येताची ते । जाण्या सिद्धची जाहले ॥१०॥ जाऊ म्हणे ती सकाळला । म्हणुन पुंडलिक झोपला । स्वप्न रात्री पडले त्याला । दिगंबर पुरुष उभा दिसे ॥११॥ शेगांवीचे गजानन । देती तयासी दर्शन । मन जाई आनंदून । कानी तयाचे बोलता ॥१२॥ माजविती दंभाचार । लागतो नादी नारी नर । वृत्ती त्यांची ती कठोर । ऐशासी गुरु का मानावे? ॥१३॥ तुझी असेल जी जो आस । पुरवीन मी तियेस । पुंडलिका लागला ध्यास । शेगावीच्या अवलियाचा ॥१४॥ निरखून पाहता तो योगी । आला असे आपणालागी । अंजनगावचा तो ढोंगी । पुरुष तया तो जाणवला ॥१५॥ नित्य व्हावया दर्शन । पादुका घेई तो मागून । करावया नित्य पूजन । मनी निर्धार ठरविला ॥१६॥ पादुका तया देऊन । महाराज पावले अंतर्धान । पुंडलिका जाग येऊन । सभोवार पाहू लागला ॥१७॥ पहाट होता खरी । भागाबाई तो उभी दारी । चाल म्हणे ती सत्वरी । अंजनगावासी जावया ॥१८॥ पुंडलिक तीज वदला । गजानन गुरु केला । पाठिराखा तो मला । दूजा न करणे गुरु असे ॥१९॥ शामसिंग मुंडगावचा । भक्त तोही गजाननाचा । मार्ग धरी शेगांवचा । दर्शना कारणे सद्गुरुच्या ॥२०॥ परतुनी जाता आपल्या गावी । महाराज वदले भेट घ्यावी । बाळाभाऊस सांगती नेण्या लावी । पादुका पुंडलिकासी द्यावया ॥२१॥ सद्गुरु आज्ञा घऊन शामसिंग गेला परतून । पादुका पुंडलिका देऊन । निघून गेला तो तेथूनी ॥२२॥ राजाराम नामे ब्राह्मण । धंदा सराफी दुकान । कृपा संताची ती जाण । पुत्र दोन ते लाभले ॥२३॥ गोपाळ, त्र्यंबक नामे त्यांची । श्रद्धा देवावरी साची । सेवा तीच गजाननाची । भक्ती भावे त्र्यंबक करी ॥२४॥ इच्छा झाली तया मनीं । द्यावी महाराजा मेजवानी । आवडीचे पदार्थ करोनी । भोजन आणिले गुरुराया ॥२५॥ विचार तैसा कवराचा । झुनका भाकरी देण्याचा । निर्धार होई मनाचा । स्टेशनावरी तो पातला ॥२६॥ वेळ झाला येण्या फार । गाडी निघून गेली दूर । दुसऱ्या गाडीस भरपूर । वेळ होता जाण्यासी ॥२७॥ परी न ढळला मानस । जाणे मनी शेगांवास । झुनका भाकरी गजाननास । कवर गेला द्यावयासी ॥२८॥ वाट पाही योगीराणा । गेला तोची दर्शना । न करिताची भोजना । महाराज असती आसनी ॥२९॥ कवरासी त्या पाहून । हर्षित झाले गजानन । झुनका भाकरी घेती सद्गुरु खावया ॥३०॥ आनंदले दयाघन । कवरासी दिले अभिवचन । कार्य तव सफल जाण । होईल ऐसे सांगती ॥३१॥ भक्त मनी आनंदला ॥ माथा चरणी त्या ठेविला । परतुनी घरी गेला । तार आली असे गृही ॥३२॥ नोकरीचे बोलावणे । सत्य झाले गुरु कृपेने । जो भजे तया उणे । नच कांहीं घडतसे ॥३३॥ ऐसे येती अनुभव । जिथे भक्तिचा अभाव । तिथे कैसा हा प्रभाव । पहावया मिळेल हो? ॥३४॥

इति श्रीगजानन महात्म्य शोडषोध्यायः समाप्त॥

 

।। अध्याय १७ वा।

 श्री गणेशाय नमः॥ जय जय लक्ष्मी रमणा । शेषशाई नारायणा । वैकुंठीचा तुची राणा । भक्ता कारणे प्रगटसी ॥१॥ प्रल्हादास्तव नरहरी । स्तंभामाजी श्रीहरी । कश्यपू असूरी । पोट विदारुनी मारिला ॥२॥ उग्ररुप तव जरी । प्रल्हादाचा कैवारी । घेसी तया अंकावरी । भक्त सखा तूंची खरा ॥३॥ तैसी कृपा असो देवा । मुंगी साखरेचा रवा । गोड करूनी घेई सेवा । हीच विनंती तूज असो ॥४॥ भक्त प्रिय गजानना । अकोल्यासी त्या जाणा । स्वये देऊनी दर्शना । तया गृही राहसी ॥५॥ कृष्णा बापू चापडगांवी । बच्चुलालाने भेट घ्यावी । जीजाई पंडीत आणिक नवी । भक्त मंडळी असती तव ॥६॥ खटाऊच्या गिरणीत । समर्थ येती अकोल्यात । मुक्कामासी अवचित । कल्पना नसता कुणासही ॥७॥ विष्णुसा नामे सावकार । ग्राम ज्याचे मलकापूर । घेऊनी यावे हा निर्धार । महाराजासी आपुल्या गृही ॥८॥ म्हणून गेला अकोल्यास । विनविता झाला भास्करास । जो गजाननाचा शिष्य खास । केले बोलणे तया सवे ॥९॥ दिले तयासी वचन । मलकापुरी येईल घेऊन । महाराजासी निश्चित जाण । समाधान झाले विष्णुसाचे ॥१०॥ भास्कर विनवी सद्गुरुसी । जाणे असे मलकापुरासी । परी नकार देती त्यासी । अट्टाहासे तो बैसला ॥११॥ आग्रहास्तव गजानन । गाडीत बैसले जाऊन । वस्त्र रहित पाहून । कुजबुज जन करीत ते ॥१२॥ महाराज उठले तेथून । नजर त्यांची चुकवून । डबा बायकांचा पाहून । त्याच ठायी बैसले ॥१३॥ मूर्ति पाहूनी दिगंबर । स्त्रिया घाबरल्या फार । ओढिली साखळी अखेर । कथीला वृत्तांत पोलिसाला ॥१४॥ येई अधिकारी पोलिसचा । हात धरी महाराजांचा । यत्न त्याचा उतरविण्याचा । परी न मानिती गजानन ॥१५॥ अधिकारी गेला स्टेशनासी । सांगितला वृत्तांत मास्तरासी । स्टेशन मास्तर डब्यापाशी । घेऊन आला त्वरीत तो ॥१६॥ योगीराज गजानन । बघता द्रवले त्याचे मन । वदे जरी हे नग्न । सोडून द्यावे हो याजला ॥१७॥ असती हे संत थोर । साक्षात भगवंत अवतार । असे खचित मी लाचार । गुन्हेगार नसती खरे ॥१८॥ अती आदरे केले नमन । महाराजा घेतले उतरून । पुढे जठार साहेब यऊन । खटला तयावरी भरला असे ॥१९॥ व्यंकटराव अकोल्याचे । देसाई घराणे त्यांचे । कामा निमित्त येणे त्याचे । आले असती त्या ठायी ॥२०॥ मंडळी जमली तिथे फार । खटला ऐकण्या बंगल्यावर । देसाई नामे गृहस्थ थोर । जठार साहेबा विचारती ॥२१॥ काय असे इथे आज । समोर दिसती महाराज । आणि इतरही समाज । जमण्या है कारण काय असे ॥२२॥ जठार वदती तयासी । कसे न ठावे तुम्हासी । चालविणे आहे खटल्यासी । गजाननावरी जो भरला असे ॥२३॥ देसाई झाले मनी खिन्न । विनंती करिती कर जोडून । भगवत् मूर्ति गजानन । खटला नका हा चालवू ॥२४॥ गजानन हा योगी राणा । वंदनीय असती अवघ्यांना । चूक झाली असे जाणा । इथे तयासी आणविले ॥२५॥ शिष्य भास्कर सवे आला । खुर्ची दिली बसण्या त्याला । जठार वदती स्वामीला । वस्त्राविणे फिरणे योग्य नसे ॥२६॥ महाराज होते आसनी । जठारास वदती हासुनी । गुन्हेगार आम्ही कायद्यानी । योग्य वाटे ते करा ॥२७॥ तया वदती आपण । चिलम भरावी न लावी क्षण । ऐसे ऐकता वचन । भानावरती ते आले ॥२८॥ पांच रुपये भास्कराला । जठारानी दंड केला । निकाल तो ऐसा दिला । महाराजा ठेविले विवस्त्र म्हणुनी ॥२९॥ एकदां अकोल्यास गजानन । असता मेहताब येऊन । एकमेका आलिंगन । देते झाले त्या ठायी ॥३०॥ हिंदु आणि मुसलमान । भेद न त्या ठायी जाण । कराया जन कल्याण । सिद्ध पुरुष ते खचितची ॥३१॥ नंतर गेले अकोटासी । भेट द्याया नरसिंहजीसी । जाऊन बसती विहिरी पासी । आंत डोकावून पाहती ॥३२॥ वदती घडावे स्नान । आंत सोडूनी बसती चरण । पाणी येई उफाळून । स्नान घडले संतासी ॥३३॥ यारे यारे सारे जण । तीर्था माजी करी स्नान । सकला करिती पावन । अधिकार तोचि सद्गुरुचा ॥३४॥

इति श्री गजानन महात्म्य सप्तदशोध्याय : समाप्त।

 

 

॥ अध्याय १८ वा॥

 

 श्री गणेशाय नमः ॥ जय जय रुक्मिणीवरा पढंरीनाथा । कुंडले कानी किरीट माथा । पितांबर कटी जगन्नाथा । अनंत रूपे नटलासी ॥१॥ द्वारका मथुरा वृंदावन । तुझ्या कृपेने झाले पावन । खेळगडी ते गोपगण । जगज्जीवना श्रीहरी ॥२॥ दळू लागला जनीसी । वेड लाविले मिरेसी । उभा ठाकला पंढरीसी । पुंडलिकास्तव विठ्ठला ॥३॥ युगानुयुगे भक्तगण । तिथे येती घ्याया दर्शन । दीनानाथ दयाघन । पतित पावन तूंच की ॥४॥ बायजा नामे भक्तिण । दैवत तिचे गजानन । जातीने ती माळीण । मुंडगांव ग्राम तिचे ॥५॥ बालपणी लग्न झाले । भाग्यात होते लिहिले । संसार सुख ना लाभले । षंढ पती तिचा असे ॥६॥ माता पित्या दुःख अती । करून द्यावा दुसरा पती । विचार येई ऐसा चित्ती । भुलाई शिवरामा वदनसे ॥७॥ शिवराम पिता त्यांवर । पत्निस वदे न सोडी धीर । नशीबीच नसेल संसार । दोष तिचा काय असे ॥८॥ करून पाहू उपचार । भोलाई होई निरुत्तर । तारुण्याचा अवसर । बायजा सुंदर रुपवती ॥९॥ थोरला दीर तीज पाहून । कामुक होई त्याचे मन । बायजा सवे भाषण । सप्रेमे तो करी सदा ॥१०॥ प्रयत्न केले अती त्याने । नाकारीले तया बायजाने । पती पत्नी नाते जोडणे । कदापिही मान्य नसे ॥११॥ नित्य काळ हरी स्मरणी । घातला असे बायजानी । मिठी घातली चरणी । लाज राखावी प्रभूवरा ॥१२॥ जेष्ठ दीर बायजा पासी । हेतू वाईट धरून मानसी । रात्रीच्या समयासी । उन्मत्त होऊनी पातला ॥१३॥ बायजा होई लाचार । परी धरुनिया धीर । सोडा म्हणे अविचार । पित्या समान मज तुम्ही ॥१४॥ अंगावरी टाकता हात । पडला माडीवरून त्याचा सूत । बायजा जाऊनी धावत । बालका घेई उचलूनी ॥३५॥ खोक पडली डोक्यास । बायजा लावी औषधास । करणीचे फळ दिरास । मिळालेचना म्हणतसे ॥१६॥ भुलाबाई आणि शिवराम पिता । शेगांवी येती तत्वता । महाराजासी विचारता । होई भाकीत बायजाचे ॥१७॥ जरी लग्न करिसी बायजाचे । पुत्र नाही नशीबी हिचे । कल्याण करणे जरी तिचे । घेऊनी जावे स्वग्रामी ॥१८॥ जेवढे पुरुष असती कोणी । बंधू पिता समजूनी । वागणे तिचे तूं मानी । विधी लिखीत सत्य हे ॥१९॥ बायजेसी झाला आनंद । नामस्मरणी परमानंद । ध्यानी मनी तो श्रीरंग । पुंडलिका सवे राही सदा ॥२०॥ पुंडलिका समवेत । येई बायजा शेगांवात । पुंडलिक गजानन भक्त । मुंडगांव हे ग्राम त्याचे ॥२१॥ नित्य करिती दोघे वारी । गजानानच्या दरबारी । शुद्ध भाव तो अंतरी । जन निंदा ती होत असे ॥२२॥ ही राहील जन्मभरी । वृत्ती सदा ब्रह्मचारी । जनाबाई पंढरपूरी । ऐशापरी ती राहिली ॥२३॥ खामगांवला भक्त थोर । होता राजाराम कवर । फोड झाला दुर्धर । डॉक्टर अधिकारी आणविला ॥२४॥ बहुत केले उपचार । आराम नसे तीळभर । कवराने टाकिला भार । सद्गुरु गजाननावरी ॥२५॥ रात्रीच्या त्या समयासी । ब्राह्मण रूपे दारासी । हाक मारी कवरासी । परी ओळख कुणा नच त्यांची ॥२६॥ तीर्थ अंगारा घेऊन । आलो शेगांवाहून । फोडासी द्यावा लावून । तीर्थ पाजून हो द्यावे ॥२७॥ देऊन तीर्थ अंगारा । गेला ब्राह्मण माघारा । फोड तो फुटला खरा । अंगारा तो लावताची ॥२८॥ पंढरपुरा गेले जन । सवे होते गजानन । पाटील मंडळी सज्जन । सुख सोहळा तो पाहती ॥२९॥ सर्व गेले दर्शनासी । सोडूनी मागे बापुण्यासी । तो वदला गजाननासी । दर्शन मजला घडवा हो ॥३०॥ गजाननाने केली मात । स्वयें होती पंढरीनाथ । बापुण्यास पडे भ्रांत । कैसे अघटीत घडले हे ॥३१॥ मृत श्वान जागविले । भक्तगणा सुखविले । कार्य ऐसे थोर झाले । कृपेने तव गजानना ॥३२॥

इति श्रीगजानन महात्म्य अष्टादशोध्यायः समाप्त।

 

|| अध्याय १९वा।।

 श्री गणेशाय नमः ॥ जय जय नंद नंदना मुकुंदा । परमानंदा आनंद कंदा । व्रजभूषणा गोविंदा । नमन तुजला श्रीधरा ॥१॥ करुणाघना राधारमणा । दीनवत्सला दयाघना । ब्रजपाला राजीव नयना । मागणे एकच तुजप्रती ॥२॥ शेगांवासी मज न्यावे । चरणी संताच्या घालावे । अभयदान मज द्यावे । प्रासादिक हे लिहावया ॥३॥ शेगांवी असता संत । आला दर्शना काशीनाथ । खंडेरावाचा हा सूत । गद्रे घराण्यात जन्मला ॥४॥ कृपा जाहली तयावर । घरी आली असे तार । मन झाले असे आतूर खामगांवा जावयासी ॥५॥ तार घेऊन हातात । उभा शिपाई दारात । मजकूर पाहता त्यांत । समाधान तया वाटले ॥६॥ हुद्दा मुनसफीचा खास । मिळाला असे हो

तयास । मोर्शी नामे ग्रामास । जाणे लागले तयासी ॥७॥ गजानन येती नागपूरी । बुटी गोपाळराव यांचे घरी । घराणे हे परोपकारी । संत सेवा ब्रीद साचे ॥८॥ शेगांवचे भक्तगण । महाराज जाता दुःखी मन । आणावे तया परतून । इच्छा त्यांची तीच असे ॥९॥ शेगांवीचे लोक आले । बुटी सदनासी ते गेले । सद्गुरु चरण वंदीले । गोपाळ हरी पाटलाने ॥१०॥ वदती गजानन पाटलासी । घेऊन चला शेगांवासी । इथे न गमे आम्हासी । सांगती ते सकळ जन ॥११॥ बुटी गृही भोजन । घेऊनी निघती गजानन । आशीर्वच तया देऊन । घरी गेले रघुजीच्या ॥१२॥ राजे रघुजी असती थोर । लौकिक तयांचा दूरवर । केला महाराजा पाहूणचार । रामटेक मुक्काम गाठला ॥१३॥ घेऊनी रामाचे दर्शन । शेगांवी गेले गजानन । हरि पाटलासी घेऊन । समागमे भक्तांच्या ॥१४॥ धार कल्याणचे रंगनाथ । स्वामी आले शेगांवात । आध्यात्मातुनी संकेत । देत असती एकमेका ॥१५॥ वासुदेवानंद सरस्वती । कृष्णा तटाकी ज्यांची महती । कर्म योगी ज्यांची प्रिती । सिद्ध योगी तोही असे ॥१६॥ येणार इथे भेटायासी । सांगती गजानन बाळासी । प्रेमभाव हृदयासी । ज्ञान संपन्न तो कर्मठ ॥१७॥ स्वामी येताची आदर । कथीत केला समाचार । हर्ष झालासे अपार । हरिहर भेट ती जाहली ॥१८॥ करुनी गजानना वंदन । गेले योगेश्वर परतून । मार्ग त्याचा असे भिन्न । आपणाहूनी खचितची ।।१९।। सांगती बाळाभाऊसी गजानन । ईश्वर भक्तिचे मार्ग तीन। व्रत वैकल्ये अनुष्ठान । हीच अंगे कर्माची ॥२० शुद्ध भाव लीनता । अंगी असावी तत्वता । भजनी पूजनी आस्था । नामस्मरण हे सत्यची ॥२१॥ योगी मुनी जे भूवरी। कर्म मार्ग हा आचरी । तया योगे श्रीहरी । होऊनी त्यांचा राहिला ॥२२॥ साळुबाई भक्त थोर । ग्राम तिचे वैजापूर । बाडे घोडे माहेर गजानन दरबारी राहिली ॥२३॥ वेद विद्येचा जाणता । गजानन ज्ञान सविता । वैदिक कुणी वेद म्हणता । चुकताची सद्गुरु सांगती ॥२४॥ आत्माराम वेद संपन्न । सेवेसी अर्पिले जीवन । गजानन सेवे कारण । एकनिष्ठ भक्त तो ॥२५॥ स्वामी दत्तात्रय केदार । दूजा नारायण जामकर । दूधच ज्याचा आहार । भक्त तीन जाहले ॥२६॥ मोरगांवी मारुतीपंत । पीक होते शेतात । रक्षण पिकाचे करण्याप्रत । तिमाजी नामे एक होता ॥२७॥ रास होती खळ्यांत । तिमाजी झाला निद्रित । गाढवे येऊनी खात । असती धान्य ते खळ्यांतील ॥२८॥ गजानने केली लीला । जागविले तिमाजीला । गाढवे पाहता घाबरला । महाराज अदृष्य जाहले ॥२९॥ तिमाजी सांगे मालकासी । मारुतीपंत ना रागविले त्यासी । गजानन सांगती येता दर्शनासी । प्रकार घडला तो तैसा ॥३०॥ शके अठराशे सोळात । महाराज आले बाळापुरात । स्वारी बैसली आनंदात । बैठली समोर सुखलालाच्या ॥३१ ।। मूर्ति होती दिगंबर । भाविक करिती नमस्कार । आला पोलीस हवालदार । मारु लागला महाराजा ॥३२॥ त्याचा परिणाम तो झाला । आप्त गेले स्वर्गाला । हवालदारही ना राहिला । पंधरा दिवसातच स्वर्गवासी ॥३३॥ पंढरपुरी येती गजानन । चंद्रभागेचे केले स्नान । विठ्ठलाचे दर्शन । घेतले मंदिरी जाऊनी ॥३४॥ जोडूनिया करा । विनविले रुक्मिणीवरा । आता द्यावा आसरा । चरणापासी पांडुरंगा ॥३५॥ हरि पाटील त्यावेळी । होते तिथे सद्गुरु जवळी । आणिकही ती मंडळी । विठ्ठल दरबारी असती ते ॥३६॥ डोळ्यातूनी वाहती पाणी । गजानना पाहिले सर्वांनी । आले शेगांवी परतुनी । चिंता मनी वाटतसे ॥३७॥ सोडणार गजानन संगत । जाहले हे सर्वांश्रृत । मनी सकलांच्या ती खंत । भक्त येती दर्शना ॥३८॥ गणेश चतुर्थीचे दिवशी । महाराज वदले सकलांसी । आता गणपती बोळविण्यासी । यावे तुम्ही मठांत ॥३९॥ चतुर्थीचा तो दिवस । आनंदात काढिला खास । बाळाभाऊच्या धरिले करास । आसनावरी ते बैसले ॥४०॥ शके अठराशे बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवासरी प्रहर दिवसाला ॥४१॥ प्राण रोधिता शब्द केला । 'जय गजानन' ऐसा भला । सच्चिदानंदी लीन झाला । शेगांवात संत तो ॥४२॥

इति श्री गजानन महात्म्य एकोणविंशोध्याय : समाप्त॥

॥ अध्याय २०वा।।

 

 श्री गणेशाय नमः ॥ जय जयाजी शारङ्गधरा । शिरावरी या ठेवी करा । जगन्नायका विश्वंभरा । सर्व सुत्र तुझे हाती ॥१॥ दीनानाथा श्रीपती । कुंटीत झाली असे मती । द्यावी सख्या अनुमती । कार्य हे करावया ॥२॥ पाप ताप भव भय । हारी आता देई अभय । मी वासरु तू गाय । प्रेमे पान्हा पाजी तूं ॥३॥ शाम सुंदरा श्रीधरा । पतित पावना परम उदारा । पितांबरकटी मुकुटी तुरा । कंठी हार ते शोभती ॥४॥ मना लागली हुर हुर । समाधीस्थ ते झाल्यावर । नसे द्यावया कुणी धीर । हळहळती सकळ नरनारी ॥५॥ तुटली म्हणती कुणी नाती । ऐसे कितीक जन बोलती । परी तीच असे भ्रांती । अदृष्य असता त्याच ठायी ।।६।। श्री गजानन शेगांवात । स्वप्नी देती दृष्टांत । भक्तालागी सुखवीत । अनुभव हाची येत असे ॥७॥ कोठडे नामे गणपत । रहात होता शेगांवात । रायली म्हणुनी कंपनीत । एजंट होता दुकानचा ॥८॥ नित्या नेम दर्शनाचा । गजानन गजानन बोले वाचा । परिपाठ हाच तयाचा । मठामाजी जात असे ॥९॥ अभिषेक करूनी समाधीस । भोजन घालावे ब्राह्मणास । विजया दशमी मुहूर्तास । सिद्धता ती करी सर्व ॥१०॥ कांता वदे अन्नदान । नेहमीच करितां आपण । उद्या आहे मोठा सण । लक्ष प्रपंची असूं द्यावे ॥११॥ रात्रीस पडले तिला स्वप्न । मूर्ति गजानन पुढे नग्न । होत आहे हे प्रयोजन । यासी न अडथळा आणणे ॥१२॥ खर्च नसे अनाठायी । ब्राह्मणा वाटणे गायी । परमार्थ करणे ठायी ठायी । या सम पुण्य दूजे नसे ॥१३॥ पतीस झाली ती सांगती । आनंद न मावे त्याच्या चित्ती ॥ पालटली तिची ती मती । कुविचार मनी नच राहिला ॥१४॥ लक्ष्मण हरी जांजळास । अनुभव आला असे खास । बोरी बंदर स्टेशनास । संन्यासी रूपाने भेटले ॥१५॥ अजानुबाहू परमहंस । दृष्टी नासाग्री दिसे खास । बोलले असती लक्ष्मणास । गजाननाचा शिष्य अससी तूं ॥१६॥ कां होसी रे हताश । नच कळे हे आम्हास । काळजी असे तुझी त्यास । पुण्य तिथी केलीस साजिरी ।।१७ !! पुत्र शोक बापटासी । असून आला प्रसादासी । खास म्हणून गेहासी । सत्य असेच ते सांग ना? ॥१८॥ लक्ष्मण होतसे कष्टी । सुनेच्या ऐकोनी गोष्टी समर्थ देती तया पुष्टी । परी कोण असेल ते कळेना ॥१९॥ आदरे केला नमस्कार । गुप्त झाले योगेश्वर । स्टेशन तेच बोरी बंदर । ध्यानी मनी लक्ष्मणाच्या ॥२०॥ भेट देती अनेकांना । शुद्ध भाव जे ठेविती मना । तयांची पुरवी कामना । संत गजानन अवलिया ॥२१॥ माधव मार्तंड असे जोशी । कळंबचा तो रहिवासी । रेव्हिन्यू ऑफिसर पदविसी । ठेवी गजाननावर भरंवसा ॥२२॥ गुरुवार होता दिन । वाटे घ्यावे दर्शन । शेगांवासी जाऊन । परतून जावे स्वग्रामा ॥२३॥ शिपाई कुतुबुद्दीन । बोलला तया कर जोडून । आले आभाळ भरून । गाडीत जाणे बरे नव्हे ॥२४॥ मन नदीस होता पूर । तरी होऊ म्हणे नदीपार । दमणी करवी तयार । शेगांवी जाण्याकारणे ॥२५॥ झंझावात सुटला वारा । वर्षा होई पडल्या गारा । उडवू पाहे वारा छपरा । घाबरले ते मानसी ॥२६॥ पुरामाजी केले रक्षण । आले धावूनी गजानन । पैल तिरी पोचवून । रक्षण केले स्मरताची ॥२७॥ अनेकांच्या अनेक व्यथा । निवारिल्या सद्गुरुनाथा । तूच कैवारी दीनानाथा । अनन्य भावे भजता तूज ॥२८॥ तीर्थ अंगारा गुणकारी । नित्य करितां तिथे वारी । जिथे गजानन हृदयांतरी । पावन होती ते भक्तगणां ॥२९॥ खर्‍या खुर्‍या संतांची । सेवा न जाई वाया साची । परी निष्ठा मानवाची । जडावी लागे सत्यची ॥३०॥

इति श्री गजानन महात्म्य विंशोध्याय : समाप्त।

 

॥ अध्याय २१ वा ॥

श्री गणेशाय नमः॥ जय जय अनंता अद्वैता । अविनाशा भगवंता । भव भय हरणा गुणातिता । ब्रह्मांड नायका नमितो तुज ॥१॥ तूंच अससी सर्वा ठायी । नत मस्तक हे तुझिया पायी । नारद तुंबरु तुजला ध्यायी । जगज्जीवना जगत्पते ॥२॥ हाते घडता पातकासी । तूंच निवारण करिसी त्यासी । धाव वेगी हृषीकेशी । भक्त वत्सला दीन बंधो ॥३॥ पतित पावन तुजला म्हणती । सतेज सुंदर लख लख कांती । चक्र सुदर्शन धरीले हाती । संहारक तूं दुष्टांचा ॥४॥ जो जो येई भेटण्यासी । चिंता नेसी तूं लयासी । जे जे आवडे देसी त्यासी । पूर्णानंद तू व्यंकटेशा ॥५॥ पाप पुण्याची वासना । उपजविसी तूंच नारायणा । पसायदान देई या दीना । कळस अध्याय गोड करी॥६॥ स्तोत्र कथा तुझे गाणे । गाती भक्तगण आवडीने । गजाननाची  ही स्तवने । भाव पुष्पे ही समर्पिली ॥७॥ आता असावे सावधान । कळस अध्याय हा करिता कथन । कर्ता करविता गजानन । निमित्तासी कारण दास असे ॥८॥ एकनिष्ठा असे ज्याची । सेवा करण्या गजाननाची । सार्थकता त्या जीवनाची । कृपा प्रसाद तो लाभता ॥९॥ बांधित असता मंदिर । काम करिता शिखरावर । खाली पडला एक मजूर । हाताखालचा गवंड्याच्या ॥१०॥ तीस फुटावरून खाली । देहयष्टी ती कोसळली । घडीव चिरे त्या स्थली । तया वाचविती गजानन ॥११॥ एक बाई रजपुताची । राहणार ती जयपूरची । बाधा तिजला भूताची । तया कारणे ती आली ॥१२॥ दत्तात्रयाचा दृष्टांत झाला । ती असता जयपूरला । जाई तूं रामनवमीला । शेगांवी गजानन दर्शनासी ॥१३॥ दृष्टांत झाला म्हणून । आली मुलास घेऊन । उत्सव असता संपन्न । सभा मंडपी ती बैसली ॥१४॥ खांब तिथे दगडाचे । उभे असती मंडपाचे । भाग्य उजळण्या त्या साध्वीचे । खांब तिथे कोसळला ॥१५॥ खांब अंगावरी पडला । इजा मुळी न झाली तिला । लोकांनी तो उचलिला । वाचले प्राण त्या बाईचे ॥१६॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । परम भक्त गजाननाचा । रहिवासी तो शेगांवचा । घरी गेले गजानन  ॥१७॥ गोसाव्याचा असे वेष । मागती तया भोजनास । देती सद्गुरु हाकेस । दारासी तो पातला ॥१८॥ निरखून पाहता गोसाव्यासी । स्वामी गजानन दिसती त्यासी । धरुनिया हातासी । पाटावरती बसविले ॥१९॥ सुग्रास दिले भोजन । गोसावी पावला समाधान । आशीर्वच तया देऊन । अंतर्धान ते पावले ॥२०॥ श्री गजानन चरित्र । असे हे परम पावन पवित्र । निष्ठा सबळ पाहिजे मात्र । अनुभव तोची यावया ॥२१॥ गजानन चरित्र अवतरणिका । उमजावी ही अनेका । यातील आशय थोडका । अध्याय एकविसावा हा असे ॥२२॥ मंगला चरण प्रथमोध्यायी ।  गुरुदेवाच्या वंदन पायी । निवेदन या ठायी । सार तेच या असे ॥२३॥ माघ वद्य सप्तमीसी । संत गजानन शेगांवासी । देविदास सदनापासी । प्रगट पहा ते जाहले ॥२४॥ बंकटा सदनी राहिले । मनो वांच्छीत पुरविले । अकस्मात निघून गेले । चिंता मनी बंकटाच्या ॥२५॥ टाकळीकरांच्या कीर्तनांत । भाविकां दिसले संत । पितांबरा कडुनी तुंब्यात । पाणी तयांनी भरविले ॥२६॥ पुढील अध्यायी अनेका । चमत्कार येती भाविका । पार लावी जीवन नौका । संत-कृपा तीच खरी ॥२७॥ बालक असतां अज्ञान । माता करी संगोपन । तयापरी गजानन । भक्तगणांते सांभाळी ॥२८॥ दृढ धरा मनीं भाव । रक्षण करितां हाच देव । श्री गजानन दयार्णव । मनोरथ पूर्ण करितसे ॥२९॥ गजानना प्रिय दुर्वांकुर । एकवीस अध्याय हेच सार । भाव पुष्प चरणावर । सद्गुरुच्या या वाहिले ॥३०॥ होऊनिया शुचिर्भूत । आसनावरी व्हावे स्थित । श्रद्धाभाव ठेऊनी मनात । चरित्र पाठ हा करावाची ॥३१॥ माधव तनय पार्वती कुमार । ग्राम ज्याचे मेहकर । मुक्काम हल्ली नागपूर । कळस अध्याय संपविला ॥३२॥ पौष वद्य द्वादशी गुरुवार । कालयुक्त नाम संवत्सर । श्री गजानन महात्म्य साकार । कृपेने तयाच्या जाहले ॥३३॥ श्री गजानना सद्गुरु नाथा । तव चरणी विनम्र माथा । शिरी ठेवी कृपा हस्ता । अभय दान हे मागतसे ॥३४॥ माता पिता दीन बंधू । कृपा सागर करुणा सिंधू । योगी महात्मा गजानन साधू । वंदन भावे तया प्रती ॥३५॥

इति श्री गजानन महात्म्य एकविंशतोध्याय : समाप्त॥




 

Comments